परभणी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा पक्ष्यांना फटका
स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनावर प्रश्नचिन्ह सेलू तालुक्यातील नद्या, नाले आणि तलाव कोरडे पाण्याअभावी वन्यजीवांची भटकंती वाढली परभणी, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने पाठ फिरवल्याने सेलू तालुक्यातील नद्या, नाले, पाणवठे आणि पा
ण


स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनावर प्रश्नचिन्ह

सेलू तालुक्यातील नद्या, नाले आणि तलाव कोरडे

पाण्याअभावी वन्यजीवांची भटकंती वाढली

परभणी, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने पाठ फिरवल्याने सेलू तालुक्यातील नद्या, नाले, पाणवठे आणि पाझर तलाव ऑक्टोबर महिन्यातच कोरडे पडले आहेत. याचा परिणाम वन्यजीवांवर होऊ लागला असून, हिवाळ्यात दरवर्षी विदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांच्या अधिवासावरही संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी आणि अन्नाची उपलब्धता कमी झाल्याने यंदा परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन घटण्याची भीती पक्षीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

हिवाळ्याच्या सुरुवातीला चीन, मंगोलिया, सायबेरिया आणि रशियासारख्या अतिथंड प्रदेशांतून अनेक प्रजातींचे पक्षी अन्न आणि अनुकूल हवामानाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात. सेलू तालुक्यातील दूधना मध्यम व लघु प्रकल्प, हदगाव-पावडे परिसरातील तलाव तसेच दूधना नदीपात्र हे पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास मानले जातात.

या परिसरात दरवर्षी पट्टेरी राजहंस, चक्रवाक, तलवार बदक, थापट्या बदक, गुलाबी मैना आणि पिवळा धोबी यांसारख्या पक्ष्यांची उपस्थिती आढळते. याशिवाय रंगीत करकोचा, चमचा, शेकाट्या, सामान्य टिटवी आणि उघड्या चोचीचा करकोचा हे पक्षीदेखील परिसरात आढळणाऱ्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत.

दूधना नदीपात्र ठरते पक्ष्यांसाठी खाद्यसमृद्ध अधिवास

मोरेगावपासून पुढे दूधना नदीचे पात्र उथळ असल्याने येथे पाणपक्ष्यांना मुबलक खाद्य उपलब्ध होते. घोंगलफोड्या, रंगीत करकोचा, चक्रवाक बदक, छोटा पाणकावळा, टिटवी, पांढरा बगळा, चमचा, हळदीकुंकू बदक, काळ्या डोक्याचा शराटी, खंड्या आणि शेकाट्या अशा विविध पक्ष्यांचा या भागात अधिवास आढळतो.

मात्र, यंदा सुरुवातीच्या तुरळक पावसानंतर नदी, नाले आणि तलावांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण होईल असा पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. परिणामी, ऑक्टोबर महिन्यातच अनेक जलस्रोत कोरडे पडले आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी भटकंती करताना दिसत असून, नैसर्गिक अधिवासातील पाण्याची कमतरता त्यांच्या अस्तित्वासाठी आव्हान ठरत आहे.

यंदा स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटण्याची शक्यता

पाणथळ जागा कोरड्या पडल्याने पक्ष्यांना आवश्यक खाद्य आणि अनुकूल अधिवास उपलब्ध होण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात दूधना नदीपात्र आणि परिसरातील तलावांवर दिसणारे स्थलांतरित पक्षी यंदा कितपत येतील, याबाबत पक्षीप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षी दूधना पात्रात घोंगलफोड्यांची गर्दी

मागील वर्षी दूधना नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने घोंगलफोड्या आणि रंगीत करकोचा या पक्ष्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, यंदा हिवाळ्याच्या सुरुवातीलाच नदीपात्र कोरडे पडल्याने या पक्ष्यांना आवश्यक खाद्य आणि अधिवास मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे.

“यंदा नदीपात्र कोरडे पडल्याने घोंगलफोडे आणि रंगीत करकोचा यांसारखे पक्षी परिसरात दिसण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे,” अशी चिंता पक्षीप्रेमी माधव गव्हाणे (सेलू) यांनी व्यक्त केली.

एकूणच, पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई केवळ शेती आणि मानवी जीवनापुरती मर्यादित न राहता वन्यजीव आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावरही परिणाम करू शकते. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण याकडे लक्ष देणे आवश्यक ठरत आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande