नांदेड जिल्ह्यातील २०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन
नांदेड, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने नीट, जेईई आणि सीईटी या प्रवेश परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुर
ड


नांदेड, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने नीट, जेईई आणि सीईटी या प्रवेश परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन दिले जाणार आहे.

इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल तसेच ग्रामीण भागातील खासगी अनुदानित हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर २०२६ मध्ये प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मोफत कोचिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नीट, जेईई आणि सीईटी या प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध अभ्यास, शैक्षणिक मार्गदर्शन आणि परीक्षाभिमुख तयारीची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे खासगी शिकवणी किंवा महागडे कोचिंग घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक अडचणींचा परिणाम होऊ नये, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना गुणवत्तेच्या बळावर उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

ग्रामीण भागातील अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख, अर्ज प्रक्रिया आणि इतर आवश्यक तपशीलांबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणे अपेक्षित आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande