
जळगाव, 26 ऑक्टोबर (हिं.स.) | सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,७२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,८४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,५७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,६९० रुपये नोंदवण्यात आला आहे. तर जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४५,७४५ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३३,४९८ रुपये नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५,०८० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४,६५० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता बाजारातील पुढील हालचालींकडे लागले आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्याने खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर