
मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। ॲपलने आपल्या नव्या आयपॅड मिनीचे अनावरण केले असून, कंपनीने याला आतापर्यंतचे सर्वांत मोठे अद्ययावत स्वरूप असल्याचे म्हटले आहे. नव्या मॉडेलमध्ये ओएलईडी डिस्प्ले, अधिक वेगवान चिप, सुधारित रचना आणि पाणी व धुळीपासून संरक्षण अशा महत्त्वाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या नव्या आयपॅड मिनीची सुरुवातीची किंमत ८२ हजार ९०० रुपये असून, त्याची विक्री ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
नव्या आयपॅड मिनीमध्ये ८.५ इंचांची ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. यापूर्वीच्या मॉडेलमध्ये ८.३ इंचांची एलसीडी स्क्रीन होती. ओएलईडी तंत्रज्ञानामुळे रंग अधिक उठावदार दिसतात, कॉन्ट्रास्ट सुधारतो आणि स्क्रीनची कमाल प्रकाशमान क्षमता १२०० निट्सपर्यंत पोहोचते. याशिवाय, तेजस्वी प्रकाशात स्क्रीनवरील प्रतिबिंब कमी करण्यासाठी नॅनो-टेक्स्चर ग्लासचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र, ही सुविधा केवळ २५६ आणि ५१२ जीबी क्षमतेच्या मॉडेलमध्ये अतिरिक्त किमतीत मिळेल. नव्या उपकरणाची जाडी ५.४ मिलिमीटर असून, वाय-फाय मॉडेलचे वजन सुमारे २५४ ग्रॅम आहे. मिडनाइट आणि स्टारलाईट या रंगांमध्ये ते उपलब्ध होणार आहे.
या आयपॅडमध्ये दोन नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित ए२० प्रो चिप देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, यामुळे प्रोसेसरचा वेग ६० टक्क्यांपर्यंत, ग्राफिक्सची कार्यक्षमता २.७ पट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित कामांचा वेग ४.५ पट वाढला आहे. मॉडेलनुसार १२८, २५६ आणि ५१२ जीबी साठवण क्षमता उपलब्ध आहे.
नव्या ध्वनी प्रणालीमुळे स्पीकरसाठी स्वतंत्र छिद्रे नसून, आवाज थेट डिस्प्लेमधून बाहेर पडतो. त्यामुळे ध्वनीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. या रचनेमुळे उपकरणाला आयपी६७ मानांकन मिळाले असून, ते धूळ आणि मर्यादित पाण्याच्या संपर्कापासून सुरक्षित राहू शकते. पुढील कॅमेरा आडव्या बाजूला देण्यात आला आहे. तसेच एन१ चिपमुळे वाय-फाय ७ आणि ब्लूटूथ ६ चे समर्थन मिळते, तर सेल्युलर मॉडेलमधील सी२ चिपमुळे इंटरनेटचा वेग ५० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा दावा कंपनीने केला आहे.
१२८ जीबी वाय-फाय मॉडेलची किंमत ८२,९०० रुपये, तर सेल्युलर मॉडेलची किंमत १,००,९०० रुपये आहे. सर्वाधिक क्षमतेच्या ५१२ जीबी मॉडेलची किंमत १,१८,९०० रुपयांपासून सुरू होते. नॅनो-टेक्स्चर ग्लास आणि सेल्युलर सुविधांसह किंमत १,४८,९०० रुपयांपर्यंत जाते. या उपकरणासाठी २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.४० वाजल्यापासून पूर्वनोंदणी करता येणार आहे. सर्व मॉडेलवर तात्काळ कॅशबॅक आणि विनाव्याज हप्त्यांची सुविधाही उपलब्ध असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule