
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान चढ-उतार सुरू असताना घसरलेल्या पातळीवरून सावरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह लाल चिन्हात झाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच मंदीवाल्यांनी विक्रीचा दबाव निर्माण केला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरत गेले. मात्र, काही वेळानंतर खालच्या पातळीवरून खरेदी सुरू झाल्याने बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. बाजारात सातत्याने सुरू असलेल्या खरेदी-विक्रीदरम्यान पहिल्या तासाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सेन्सेक्स ०.०१ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. दुसरीकडे, निफ्टी ०.०८ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत होता.
बीएसईचा सेन्सेक्स आज १२२.३७ अंक अर्थात ०.१७ टक्क्यांच्या घसरणीसह ७३,४८४.३८ अंकांच्या पातळीवर उघडला. व्यवहाराला सुरुवात होताच बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला. त्यामुळे हा निर्देशांक घसरून ७३,२१०.७६ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. इन्फोसिस आणि टीसीएससारख्या मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारावर सुरुवातीला दबाव निर्माण झाला. मात्र, काही वेळानंतर खालच्या पातळीवर खरेदीदारांनी आघाडी घेतली. विशेषतः भारती एअरटेल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्ससारख्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला.
खरेदीच्या या पाठबळामुळे सेन्सेक्सने नीचांकी पातळीवरून सावरत हिरव्या चिन्हात ७३,६४४.३८ अंकांची उच्चांकी पातळी गाठली. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा विक्री सुरू झाल्याने हा निर्देशांक घसरून लाल चिन्हात आला. बाजारात सातत्याने सुरू असलेल्या खरेदी-विक्रीदरम्यान पहिल्या तासाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०.१५ वाजता सेन्सेक्स ६.६३ अंक अर्थात ०.०१ टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह ७३,६००.१२ अंकांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसत होता.
सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही आज ४४.४० अंक अर्थात ०.२० टक्क्यांची घसरण नोंदवत २२,७०८.८० अंकांच्या पातळीवर व्यवहाराला सुरुवात केली. बाजार उघडताच विक्रीच्या दबावामुळे हा निर्देशांक घसरून २२,६५३.२० अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. मात्र, सुरुवातीच्या धक्क्यानंतर प्रमुख औषधनिर्माण आणि वाहन कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी सुरू झाल्याने निर्देशांकाच्या स्थितीत सुधारणा होऊ लागली. त्यामुळे निफ्टी २२,८०४.५० अंकांच्या पातळीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. बाजारात सातत्याने सुरू असलेल्या खरेदी-विक्रीदरम्यान पहिल्या तासाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०.१५ वाजता निफ्टी १९.१५ अंक अर्थात ०.०८ टक्क्यांच्या वाढीसह २२,७७२.३५ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
आतापर्यंतच्या व्यवहारादरम्यान शेअर बाजारात २,८२३ समभागांमध्ये सक्रिय खरेदी-विक्री सुरू होती. यापैकी २,२३९ समभाग नफ्यासह हिरव्या चिन्हात व्यवहार करत होते, तर ५८४ समभाग घसरणीसह लाल चिन्हात व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० समभागांपैकी १५ समभाग खरेदीच्या पाठबळामुळे हिरव्या चिन्हात होते. दुसरीकडे, १५ समभाग विक्रीच्या दबावामुळे लाल चिन्हात व्यवहार करत होते. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या ५० समभागांपैकी २६ समभाग हिरव्या चिन्हात, तर २४ समभाग लाल चिन्हात व्यवहार करताना दिसत होते.
आज सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारात शेअर बाजारातील प्रमुख कंपन्यांपैकी टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे समभाग ६.१८ टक्के, भारत इलेक्ट्रॉनिक्सचे २.३० टक्के, बीएसई लिमिटेडचे १.३५ टक्के, बजाज ऑटोचे १.२३ टक्के आणि मॅक्स हेल्थकेअरचे ०.८९ टक्के वाढीसह व्यवहार करत होते. या कंपन्यांच्या समभागांमधील वाढीमुळे बाजाराला आधार मिळण्याचा प्रयत्न होत होता. दुसरीकडे, सर्वाधिक घसरण झालेल्या समभागांमध्ये इन्फोसिस २.८८ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर २.८२ टक्के, टीसीएस १.९५ टक्के, एशियन पेंट्स १.३४ टक्के आणि एचसीएल टेक १.२४ टक्क्यांच्या घसरणीसह लाल चिन्हात व्यवहार करत होते.
यापूर्वी, गेल्या सोमवारी झालेल्या व्यवहारात सेन्सेक्स ४८२.९२ अंक अर्थात ०.६६ टक्क्यांच्या वाढीसह ७३,६०६.७५ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टीने १५३.२० अंक अर्थात ०.६८ टक्क्यांची झेप घेत २२,७५३.२० अंकांच्या पातळीवर सोमवारील व्यवहाराची सांगता केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule