जामिया मिल्लियामधील आंदोलन मागे; विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या मंजूर
विद्यार्थी संघाच्या स्थापनेनंतर 15 दिवसांत निवडणुका घेण्याची घोषणा नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : राजधानी दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आज, सोमवारी अखेर मा
जामियातील विद्यार्थी आंदोलनाचा संग्रहित फोटो


विद्यार्थी संघाच्या स्थापनेनंतर 15 दिवसांत निवडणुका घेण्याची घोषणा

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : राजधानी दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आज, सोमवारी अखेर मागे घेण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले उपोषणही संपवले. विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात मागण्या सादर केल्यानंतर प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केला.

विद्यार्थी संघाच्या निवडणुका 15 दिवसांत

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघटनेची स्थापना झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत निवडणुका घेण्यास सहमती दर्शवली आहे. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका पूर्ववत सुरू करणे, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली शिस्तभंगाची कारवाई रद्द करणे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणे, या विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत.

निलंबन आणि कारणे दाखवा नोटिसा मागे

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आलेली निलंबनाची कारवाई आणि कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच आंदोलनाच्या काळात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे.दरम्यान, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलनादरम्यान केलेल्या बदनामीकारक विधानांबाबत, कृतींबाबत किंवा सोशल मीडियावरील पोस्टबाबत पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे. संबंधित पोस्ट सोशल मीडिया माध्यमांवरून तातडीने हटवण्यात येतील, असेही नमूद करण्यात आले आहे. या बाबींची नोंद प्रशासनाने घेतली असून, त्यांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवली जाणार आहे.

आंदोलनस्थळी संशयित तरुणाच्या घोषणांमुळे खळबळ

दरम्यान, रविवारी जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील गालिब स्टॅच्यू लॉन येथे आंदोलन सुरू असताना सुरक्षा रक्षकाचा गणवेश परिधान केलेला एक संशयित तरुण सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाला. त्याने ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्याने परिसरात खळबळ उडाली. तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणाने आपण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगितले. तो ब्लिंकिट या कंपनीसाठी काम करत असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी त्याची चौकशी केली.

विद्यापीठाच्या गेट क्रमांक 7 जवळही गोंधळ

दुसरीकडे, विद्यापीठाच्या गेट क्रमांक 7 बाहेर आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी आणि गोंधळ घालणाऱ्या सुमारे सहा आंदोलकांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेऊन तेथून हटवले.विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांच्या मागणीवरून सुरू झालेल्या या आंदोलनाची अखेर प्रशासनाच्या आश्वासनांनंतर सांगता झाली आहे. आता विद्यार्थी संघटनेची स्थापना आणि त्यानंतर १५ दिवसांच्या आत निवडणुका घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

----------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande