
सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांना शाह यांचा पाठिंबा
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी कोलकाता येथील सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एसआरएफटीआय) येथील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या विचारसरणीशी आणि धोरणांशी सहमत नसणाऱ्यांचा सूड घेऊ इच्छितो, असा दावा शाह यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रत्युत्तर देत, विरोधाच्या नावाखाली शाह भारतविरोधी मोहीम चालवत असल्याचा आरोप केला.
संस्थेतील आंदोलनाला हिंसक वळण
मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेतील तणावाला 27 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. नियमानुसार परवानगी घेऊन आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान आंदोलनकर्ते विद्यार्थी मुख्य सभागृहात घुसले. त्यानंतर मारहाण आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. संस्थेच्या कुलगुरूंवरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. या घटनांनंतर 500 हून अधिक विद्यार्थी अनिश्चितकालीन धरण्यावर बसले आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वाद अधिक तीव्र झाला.
‘भारतात लोकांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य’
कर्नाटकातील हुबळी येथे संवाद साधताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शाह यांच्या वक्तव्यावर टीका केली. भारतात लोकशाही नसल्याचा दावा काही जण सातत्याने करतात; मात्र देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे ते म्हणाले.
भारतात नागरिकांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळते, हीच देशातील लोकशाही मजबूत असल्याची आणि घटनात्मक मूल्ये अस्तित्वात असल्याची साक्ष आहे, असे जोशी यांनी नमूद केले.
संजय निरुपम यांचीही नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका
दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकेवर टीका केली. देशातील लाखो लोक शाह यांच्या अभिनयाचे कौतुक करतात; मात्र त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांचे वेगळे रूप समोर आले आहे, असे निरुपम म्हणाले.अभिनेते म्हणून ओळख असलेल्या शाह यांच्यात कट्टरपंथी विचारसरणी असलेल्या राजकीय व्यक्तीची प्रतिमा दिसू लागली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
वक्तव्यांमुळे राजकीय चर्चेला वेग
सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नसीरुद्दीन शाह यांनी दिलेला पाठिंबा आणि त्यावर भाजपच्या नेत्यांनी केलेली टीका यामुळे या प्रकरणाची राजकीय चर्चा वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागील घटनाक्रम, संस्थेतील कथित हिंसाचार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबतच्या भूमिका यांवरून विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी