लूला डा सिल्वा चौथ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आले निवडून
ब्रासिलिया (ब्राझील, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। ब्राझीलचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लूला डा सिल्वा यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत विजय मिळवला आहे. ते चौथ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ८० वर्षीय डाव्या विचारसरणीचे नेते सिल्
Lula da Silva Brazil President


ब्रासिलिया (ब्राझील, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। ब्राझीलचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लूला डा सिल्वा यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत विजय मिळवला आहे. ते चौथ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ८० वर्षीय डाव्या विचारसरणीचे नेते सिल्वा हे पूर्वी कारखान्यात काम करत होते. निवडणुकीच्या पहिल्या फेरीत राष्ट्राध्यक्षपदाचे दावेदार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय फ्लावियो बोल्सोनारो आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष लूला यांच्यात चुरशीची लढत झाली. रविवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील अटीतटीच्या सामन्यात (रन-ऑफ) त्यांनी फ्लावियो बोल्सोनारो यांचा पराभव केला.

ब्राझीलमधील प्रमुख वृत्तपत्र फोल्या दे एस पाउलो आणि सीएनएनच्या वृत्तानुसार, ९९.७७ टक्के मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या फेरीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष लूला यांना ५१.७६ टक्के वैध मते मिळाली, तर बोल्सोनारो यांना ४८.२४ टक्के मते मिळाली. या विजयासह वर्कर्स पार्टीचे सदस्य असलेले लूला हे गेटुलियो वर्गास यांच्यानंतर ब्राझीलच्या इतिहासात सर्वाधिक काळ राष्ट्राध्यक्षपदावर राहणारे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. त्यांचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते एकूण १६ वर्षे सत्तेवर राहतील. ब्राझीलच्या लोकशाही इतिहासातील हा एक विक्रम ठरेल.

महागाई, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांसारखे मुद्दे प्रभावी ठरलेल्या निवडणूक प्रचारानंतर लूला यांना हा विजय मिळाला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, १९८९ मध्ये थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत दुसऱ्या स्थानावर राहूनही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारा उमेदवार प्रथमच निवडून आला आहे. लूला यांनी २००३ ते २०१० या काळात पहिल्यांदा ब्राझीलचे नेतृत्व केले होते. यंदा महागाई आणि सुरक्षेशी संबंधित चिंतांमुळे त्यांना निवडणुकीत कडव्या स्पर्धेचा सामना करावा लागला. बोल्सोनारो यांनी आपल्या निवडणूक प्रचारात गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेण्यावर भर दिला होता. तसेच खाद्यपदार्थांच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले होते. दोन्ही राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांवर त्यांच्या कुटुंबीयांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवल्यानंतर लूला यांना एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहावे लागले होते. मात्र, नंतर त्यांच्यावरील दोषसिद्धी रद्द करण्यात आली. रविवारी झालेल्या या अटीतटीच्या निवडणुकीचे निकाल मोठ्या राजकीय गदारोळात जाहीर झाले. सीएनएनच्या विश्लेषणानुसार, लूला यांच्या विजयाचा परिणाम ब्राझीलच्या सीमांपलीकडेही दिसून येईल. लूला यांच्या नेतृत्वाखाली लॅटिन अमेरिकेतील हा सर्वात मोठा देश अधिक स्वतंत्र परराष्ट्र धोरण स्वीकारेल. लूला यांनी ब्राझीलच्या सार्वभौमत्वावर भर दिला आहे. त्याचबरोबर ‘ग्लोबल साउथ’ (विकसनशील देश) आणि चीनसोबत अधिक जवळचे संबंध प्रस्थापित करण्याचे समर्थन केले आहे.

लूला यांनी १९७० च्या दशकात कामगार नेते म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘वर्कर्स पार्टी’च्या स्थापनेत मदत केली. लूला यांच्या विजयामुळे बोल्सोनारो यांच्या राजकीय चळवळीला मोठा धक्का बसला आहे. फ्लावियो बोल्सोनारो यांना ते साध्य करता आले नाही, जे त्यांचे वडील आणि ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनाही २०२२ मध्ये साध्य करता आले नव्हते. म्हणजेच निवडणुकीत लूला यांचा पराभव करणे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande