इस्रायल : नेतान्याहू आणि लष्करप्रमुखांमध्ये मतभेदाची चर्चा
इराणवरील संभाव्य हल्ल्याच्या चर्चेला वेग तेल अवीव, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : इस्रायलमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इस्रायली संरक्षण दलाचे (आयडीएफ) प्रमुख जनरल एयाल जमीर यांच्यात संभाव्य लष्करी कारवाईवरून मतभेद निर्म
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू  यांचे संग्रहित छायाचित्र


इराणवरील संभाव्य हल्ल्याच्या चर्चेला वेग

तेल अवीव, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : इस्रायलमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इस्रायली संरक्षण दलाचे (आयडीएफ) प्रमुख जनरल एयाल जमीर यांच्यात संभाव्य लष्करी कारवाईवरून मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही संभाव्य कारवाई इराणवरील नव्या हल्ल्याशी संबंधित असू शकते, अशी चर्चा सुरू आहे.इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रस्तावित लष्करी अभियान पुढे नेण्यापूर्वी जनरल एयाल जमीर यांनी पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी अधिक चर्चा करण्याची आणि लेखी कायदेशीर मंजुरी घेण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.

लष्करी सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध झालेल्या स्थानिक वृत्तांनुसार, अशा प्रकारच्या कारवाईमुळे इराणसोबतचा तणाव आणखी वाढू शकतो. निवडणुकीच्या संवेदनशील काळात घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाचे गंभीर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

काही अज्ञात सूत्रांनी राजकीय नेतृत्व निवडणुकीत आघाडी मिळवण्यासाठी इराणच्या मुद्द्याचा वापर करू शकते, अशी शंकाही व्यक्त केली आहे. तथापि, हे आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत. इस्रायलमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, नेतान्याहू यांनी एका मुलाखतीत लष्करप्रमुखांसोबत मतभेद असल्याच्या बातम्या आणि संबंधित आरोप फेटाळून लावले. त्यांनी या दाव्यांना निरर्थक ठरवले. दुसरीकडे, यापूर्वी दूरचित्रवाणीवरील एका निवेदनात त्यांनी इस्रायली लष्कर आणि मोसादला इराणमधील सत्ताधारी राजवट उलथवून टाकण्याच्या दिशेने काम करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचा नेतान्याहू यांना पाठिंबा

इस्रायलमधील राजकीय आणि लष्करी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नेतान्याहू यांना उघड पाठिंबा दिला आहे. त्यांनी इस्रायली मतदारांना मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीत नेतान्याहू यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेतान्याहू यांना यापूर्वी दिलेले समर्थनपत्र पुन्हा शेअर केले. नेतान्याहू यांच्यासोबत आपले चांगले संबंध असून, दोघांनी मिळून अनेक यश मिळवले असल्याचा दावा त्यांनी केला.

ट्रम्प यांनी नेतान्याहू यांचा उल्लेख ‘असाधारण योद्धा पंतप्रधान’ असा करत मतदारांनी मतदान करताना त्यांच्या नेतृत्वाचा विचार करावा, असे आवाहन केले.त्यांनी पुढे इस्रायलचे वर्णन ‘छोटा सैतान’ आणि अमेरिकेचे वर्णन ‘मोठा सैतान’ असे करणाऱ्या घोषणांचा उल्लेख केला. नेतान्याहू यांना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून देण्याचे आवाहन करत, सुरू केलेले काम पूर्ण करण्याची गरज असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले.

नेतान्याहू यांची एआयनिर्मित प्रतिमा चर्चेत

निवडणुकीच्या दोन दिवस आधी नेतान्याहू यांनी सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेली एक प्रतिमा शेअर केल्याचे वृत्त आहे. या प्रतिमेत तेल अवीव शहरात अणुस्फोट होत असल्याचे दाखवण्यात आले होते.उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते युवाल ब्लूमबर्ग यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत नेतान्याहू यांनी मतदारांना इशारा दिल्याचेही सांगितले जात आहे. अन्य उमेदवाराची निवड झाल्यास इस्रायलच्या अस्तित्वासमोर गंभीर संकट निर्माण होऊ शकते आणि देशाला दुसऱ्या होलोकॉस्टच्या धोक्याला सामोरे जावे लागू शकते, असा दावा त्यांनी केल्याची माहिती आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सध्याच्या कार्यकाळात उरलेला कालावधी हा इराणच्या अण्वस्त्रविषयक धोक्याचा सामना करण्यासाठी सर्वाधिक अनुकूल संधी असल्याचा युक्तिवादही नेतान्याहू यांनी केल्याचे वृत्तात नमूद आहे.

नेतान्याहू आणि गादी आयझेनकोट यांच्यात चुरशीची लढत

इस्रायलमध्ये नेतान्याहू आणि त्यांचे प्रतिस्पर्धी गादी आयझेनकोट यांच्यात चुरशीची लढत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. गेल्या 23 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या निवडणूकपूर्व अंदाजांनुसार, मतदानानंतरही देशातील राजकीय कोंडी कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.सत्ताधारी आघाडी किंवा विरोधी गट यांपैकी कोणालाही सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक तेवढे समर्थन मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इराणविषयक धोरण, संभाव्य लष्करी कारवाई आणि नेतान्याहू यांच्या नेतृत्वाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र, लष्करप्रमुखांसोबतच्या कथित मतभेदांबाबत अधिकृत माहिती आणि निवडणुकीच्या अंतिम निकालांनंतरच परिस्थितीचे स्पष्ट चित्र समोर येऊ शकेल.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande