सोलापूर विद्यापीठात शुक्रवारी राज्यस्तरीय दुष्काळ परिषद
सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.) दुष्काळाच्या समस्येवर शास्त्रीय दृष्टिकोनातून दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शुक्रवारी राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दुष्काळ : वास्तव, आव्हाने आणि उप
Univerisity Solapur


सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.) दुष्काळाच्या समस्येवर शास्त्रीय दृष्टिकोनातून दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शुक्रवारी राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दुष्काळ : वास्तव, आव्हाने आणि उपाययोजना’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत जलव्यवस्थापन, कृषी आणि अर्थकारण क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होऊन दुष्काळाच्या विविध पैलूंवर विचारमंथन करणार आहेत. विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलाच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

हिवरे बाजारच्या माध्यमातून जलसंधारण आणि ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करणारे पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन या वेळी लाभणार आहे. अनियमित पाऊस, भूजल पातळीत होणारी घट, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यांमुळे ग्रामीण भागातील जनजीवन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळाची कारणे, त्यातून निर्माण होणारी आव्हाने आणि प्रभावी उपाययोजना यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यावर परिषदेत भर दिला जाणार आहे. दुष्काळ निवारणासाठी जलसंधारण, पाण्याचे नियोजन, शेतीतील बदल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या दीर्घकालीन उपायांवर तज्ज्ञांचे विचार जाणून घेण्याची संधी या परिषदेतून उपलब्ध होणार आहे. दुष्काळ व्यवस्थापनासाठी उपयुक्त उपाययोजनांबाबत दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने या परिषदेचे महत्त्व आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande