
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाइट यांची पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेष कार्यशाळा
नाशिक, 26 ऑक्टोबर (हिं.स.)।
: जगप्रसिद्ध फ्रीस्टाइल फुटबॉलपटू जेमी नाइट यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूल, गंगापूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत फुटबॉल कौशल्यासोबतच आत्मविश्वास, एकाग्रता आणि सर्जनशीलतेची प्रेरणा दिली. जगातील आघाडीच्या दहा फ्रीस्टाइल फुटबॉलपटूंमध्ये गणले जाणारे जेमी नाइट यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अनेक विक्रम आहेत.
पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या क्रीडा उत्कृष्टता उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फ्रीस्टाइल फुटबॉलमधील विविध कौशल्यांचे थरारक प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाली. चेंडूवरील अचूक नियंत्रण आणि गुरुत्वाकर्षणालाही आव्हान देणाऱ्या कसरतींनी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
भारताच्या आठव्या दौऱ्यावर असलेल्या जेमी नाइट यांनी युरोपियन फुटबॉल महासंघाच्या युरो २०२० स्पर्धेचे अधिकृत जागतिक शुभंकर म्हणून सादरीकरण केले आहे. तसेच २०१७ आणि २०१८ मधील युरोपियन फुटबॉल महासंघाच्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यांमध्येही त्यांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले आहे.
“भारतात पुन्हा येणे आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, कौशल्य व सर्जनशीलतेत झालेली प्रगती अनुभवणे, हा नेहमीच आनंदाचा क्षण असतो. पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा उत्साह अतुलनीय आहे. त्यांची ऊर्जा आणि गुणवत्ता मला नेहमीच प्रेरणा देते,” असे जेमी नाइट म्हणाले.
पोदार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक हर्ष पोदार म्हणाले, “जेमी नाइट यांच्या प्रत्येक भेटीचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्या कार्यशाळेतून केवळ फुटबॉल कौशल्य नव्हे, तर शिस्त, एकाग्रता आणि चिकाटीचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजते. अशा अनुभवांतून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळते.”
पोदार एज्युकेशन नेटवर्क
९९ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या पोदार एज्युकेशन नेटवर्कची स्थापना शेठ आनंदीलाल पोदार यांनी १९२७ मध्ये केली. आनंदीलाल पोदार ट्रस्टचे पहिले अध्यक्ष महात्मा गांधी होते. सचोटी, सेवा आणि उत्कृष्टता ही संस्थेची मूलभूत मूल्ये आहेत. आज देशभरातील १६५ हून अधिक शाळा आणि २ लाख ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी या नेटवर्कशी जोडलेले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना आत्मविश्वासपूर्ण, सक्षम आणि जागतिक दृष्टिकोन असलेले नागरिक बनविण्यासाठी संस्था कार्यरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI