
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर (हिं.स.) | स्पॅनिश टेनिसचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल निवृत्तीनंतर दोन वर्षांनी अमेरिकेच्या कोर्टवर परतणार आहे. २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विजेता असलेला नदाल, पुढील फेब्रुवारीमध्ये लास वेगास येथे होणाऱ्या एका प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत सहभागी होईल. २७ फेब्रुवारी रोजी टी-मोबाइल एरिना येथे होणाऱ्या 'द एमजीएम स्लॅम प्रेझेंटेड बाय कॅपिटल वन' या स्पर्धेचे नदाल मुख्य आकर्षण असेल. ही स्पर्धा कॅलिफोर्नियातील इंडियन वेल्स येथे होणाऱ्या एटीपी १००० स्पर्धेच्या अगदी आधी आयोजित केली जाईल. पण, या प्रदर्शनीय स्पर्धेत सहभागी होणारे इतर टेनिसपटू आणि सामन्याचे स्वरूप येत्या काही आठवड्यांत जाहीर केले जाईल.
नदालने २०२४ मध्येही लास वेगासमध्ये एका प्रदर्शनीय सामन्यात भाग घेतला होता. त्यावेळी त्याचा सामना तरुण स्पॅनिश स्टार कार्लोस अल्कारजशी झाला होता. ते नदालच्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीचे शेवटचे वर्ष होते. त्याने २०२४ मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली.
लास वेगासमधील पुनरागमनाबद्दल बोलताना, नदाल म्हणाला की, गेल्या वेळी जेव्हा तो खेळला होता, तेव्हा शहरातील खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याचा अनुभव त्याला स्पष्टपणे आठवतो. तो म्हणाला की, तो आता त्याच्या आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर परत येत आहे, जिथे व्यावसायिक दौऱ्याचा दबाव नाही, परंतु खेळाबद्दलची त्याची आवड तशीच आहे. नदाल म्हणाला, मला नेहमीच स्पर्धा करायला आवडले आहे. माझी व्यावसायिक कारकीर्द संपली असली तरी, स्पर्धा करण्याची ती भावना कधीच पूर्णपणे नाहीशी होत नाही.
ही प्रदर्शनी स्पर्धा गेल्या वर्षीही आयोजित करण्यात आली होती, ज्यात आठ टेनिसपटूंनी भाग घेतला होता. सामने टायब्रेकर स्वरूपात खेळले गेले. आयोजक येत्या काही आठवड्यांत यावेळचे सहभागी टेनिसपटू आणि सामन्यांचे स्वरूप जाहीर करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे