
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर (हिं.स.) - आयपीएल २०२७ च्या आधी, चेन्नई सुपर किंग्सने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये पूर्णपणे फेरबदल केला आहे. चेन्नईने नुकतेच १८ वर्षांपासूनचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना हटवून त्यांच्या जागी माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता, ही फ्रँचायझी आपला संपूर्ण कोचिंग स्टाफ बदलत असून, मायकल हसी आणि राजीव कुमार यांच्यासह अनेक प्रशिक्षकांना काढून टाकत आहे.
सीएसकेमध्ये असा बदल सहसा दिसून येत नाही. पण, गेल्या तीन हंगामांतील सर्व प्रयत्नांनंतरही, ही फ्रँचायझी आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. परिणामी, त्यांनी आगामी हंगामापूर्वी कोचिंग स्टाफमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. सर्वात आश्चर्यकारक निर्णय तेव्हा आला, जेव्हा १८ वर्षांपासून संघासोबत असलेल्या फ्लेमिंग यांनी राजीनामा दिला.
सीएसकेने सहाय्यक प्रशिक्षक राजीव कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. राजीव आठ वर्षांपासून या फ्रँचायझीसोबत होते. त्यांनी सुरुवातीला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले आणि नंतर ते सहाय्यक प्रशिक्षक बनले. तथापि, सीएसकेसोबतचे त्यांचे नाते आता संपुष्टात आले आहे. राजवी यांच्या व्यतिरिक्त, सीएसकेने आठ वर्षांपासून संघासोबत असलेले फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनाही हटवले आहे.
फ्रँचायझीने गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमन आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक ग्रेग किंग यांनाही हटवण्याचा निर्णय घेतला आहे. फिजिओथेरपिस्ट टॉमी सिमसेक यांनाही हटवण्यात आले आहे. यामुळे फ्रँचायझीने एकूण पाच प्रशिक्षकांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सहायक गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम संघात कायम आहेत. मुख्य प्रशिक्षक झहीर खान आता नवीन प्रशिक्षण स्टाफ तयार करतील.
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू गॅरेथ बॅटी सहायक प्रशिक्षक म्हणून चेन्नई संघात सामील झाले आहेत. त्यांनी सरे संघाला सलग तीन काउंटी चॅम्पियनशिप विजेतेपद मिळवून दिले. सरेने २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये काउंटी चॅम्पियनशिप जिंकली. २०२५ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला, पण सलग चौथ्या विजेतेपदापासून वंचित राहिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे