
अकोला, २७ ऑक्टोबर (हिं.स.) : हिवरखेड येथील माऊली मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेमार्फत शेकडो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोसायटीच्या संचालक मंडळातील सदस्य आणि कर्मचाऱ्यांसह एकूण १७ जणांविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ४ कोटी ४१ लाख ५३ हजार १११ रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
सेवानिवृत्त शिक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा
या प्रकरणी रमेश ज्ञानदेवराव उगले (वय ६७, सेवानिवृत्त शिक्षक, रा. बारगनपुरा, हिवरखेड) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या दोन खात्यांमध्ये मिळून ४१ लाख १६ हजार ६८९ रुपये ठेवीच्या स्वरूपात जमा होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही मुद्दल आणि व्याजाची रक्कम परत मिळाली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून सोसायटीच्या हिवरखेड शाखेत पावणे आठशेहून अधिक ठेवीदारांकडून एकूण ४ कोटी ४१ लाख ५३ हजार १११ रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली. मुदत पूर्ण झाल्यानंतरही ठेवीदारांना त्यांची रक्कम परत न करता टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१६(५), ६१(२) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेवीदारांच्या पाठपुराव्याला यश
या प्रकरणात हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि ठेवीदारांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने देऊन प्रकरणाचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते धीरज बजाज, पत्रकार अर्जुन खिरोडकार, गणेश सुरजुसे, बाळासाहेब नेरकर आणि जमीर शेख यांच्यासह अन्य नागरिकांनी या प्रकरणात पाठपुरावा केला. गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास
या प्रकरणाचा व्याप मोठा असून फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जुमडे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
या कारवाईसाठी हिवरखेड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, देवानंद कायंदे, ठाणेदार सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे सहकार्य लाभल्याचे संबंधितांनी नमूद केले.
गुन्हा दाखल झालेल्या १७ आरोपींची नावे
डॉ. सुनील मोहन सरोदे
निकेत राजू धोटे
मिलिंद अनिल सोनवणे
ऋषिकेश सुनील सरोदे
अनिल बलभीम साळुंखे
ओमप्रकाश चतुरकार
पूजा मनोज उगले
राजेश ऊर्फ मिलिंद निवृत्ती गावंडे
कृष्णा जगन्नाथ सित्रे
डॉ. रामदास काशीराम धुळे
शिवाजी रामकृष्ण नराजे
प्रवीण नामदेवराव येऊल
आशिष दिलीप नाठे
डॉ. अभिजीत रमेश उगले
अनिल रामकृष्ण गावंडे
अनुराग रमेशचंद्र गुप्ता
शादिद खान शहागीर खान (राजू खान)
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असून, ठेवीदारांची रक्कम परत मिळण्याबाबत पुढील कायदेशीर कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे