
यवतमाळ, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुण युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून दिग्रस पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती सकाळी कॉलेजचे हॉल तिकीट आणण्यासाठी घरून बाहेर पडली होती; मात्र बऱ्याच वेळापर्यंत ती परतली नाही. ती बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी दिग्रस पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती.दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी शेख समीर याने त्या युवतीचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केल्याची माहिती पीडितेच्या आईला मिळाली. लग्नाचे प्रलोभन दाखवून हे धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांचा व मित्राचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी शेख समीर (वय 30), त्याचे वडील, त्यांचा मित्र शेख बिलाल या तिघांविरुद्ध दिग्रस पोलिस ठाण्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील कसून तपास अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी