सुदानमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांवर ड्रोन हल्ला; ११२ जणांचा मृत्यू
खार्टूम, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।सुदानमध्ये गृहयुद्धाची तीव्रता वाढली आहे. सोमवारी संध्याकाळी दक्षिण दारफूरमधील न्याला शहरात गर्दीच्या बाजारपेठेवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ११२ जणांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, सुदानमधील हिंसाचारावर लक्ष ठेवण
सुदानमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांवर ड्रोन हल्ला; ११२ जणांचा मृत्यू


खार्टूम, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।सुदानमध्ये गृहयुद्धाची तीव्रता वाढली आहे. सोमवारी संध्याकाळी दक्षिण दारफूरमधील न्याला शहरात गर्दीच्या बाजारपेठेवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ११२ जणांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, सुदानमधील हिंसाचारावर लक्ष ठेवणाऱ्या ‘इमर्जन्सी लॉयर्स’ या मानवाधिकार संघटनेने मंगळवारी एका निवेदनाद्वारे या हल्ल्याची माहिती दिली.

न्याला येथील डुमाया परिसरात असलेल्या ‘तनकोंग बाजारपेठे’ला लक्ष्य करण्यात आले. न्याला शहरावर निमलष्करी दल ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेस’ (आरएसएफ)चे नियंत्रण आहे. या संघटनेने या हल्ल्यासाठी सुदानी लष्कराला जबाबदार धरले असून, घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.सुदानी लष्कराच्या हल्ल्यात १०० हून अधिक जणांचा मृत्यू

वृत्तानुसार, ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ (एमएसएफ) या संस्थेने सांगितले की, न्याला येथील त्यांच्या रुग्णालयात ३६ मृतदेह आणण्यात आले. तसेच, रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात १५० जखमींवर उपचार करण्यात आले.

दारफूर व्हिक्टिम्स ऑर्गनायझेशनचे कार्यकारी संचालक अॅडम मुसा ओबामा यांनी माध्यमांना सांगितले की, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नागरिक बाजारपेठेत खरेदी करत असताना आणि नाश्ता करत असताना लष्कराशी संबंधित ड्रोनने हा हल्ला केला.अॅडम मुसा ओबामा यांनी सांगितले की, त्यांच्या संघटनेने १४ नागरिकांच्या मृत्यूची नोंद केली आहे. यामध्ये १२ महिला आणि ६ मुलांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकूण १२० जणांचा मृत्यू झाला किंवा ते जखमी झाले आहेत.

‘इमर्जन्सी लॉयर्स’च्या आकडेवारीचा हवाला देत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. तर ‘एमएसएफ’ने त्यांच्या रुग्णालयात ३६ मृतदेह आणण्यात आल्याची आणि १५० जखमींवर उपचार करण्यात आल्याची माहिती दिली. सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान ड्रोन हल्ल्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला असलेला धोका वाढत आहे. सुदानी सशस्त्र दल (एसएएफ) आणि आरएसएफ ही दोन्ही बाजू स्फोटके बसवलेल्या ड्रोनचा वापर करत आहेत.

गेल्या आठवड्यात सुदानी लष्कराने वादग्रस्त अब्येई प्रदेशातील एका बाजारपेठेवरही ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात १५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande