माधुरी दीक्षितसमोर गौतमी पाटीलचा ठसका; ‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर हॉटसीटवरच धरला ठेका
मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। “आपल्याला खेळ आता कातिल करायचा आहे!” असं म्हणत माधुरी दीक्षित गौतमी पाटील आणि शिव ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पांना सुरुवातीलाच रंगत आणणार आहे. सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात हे दोघे हॉटसीटवर विराजमान हो
Gautami


मुंबई, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। “आपल्याला खेळ आता कातिल करायचा आहे!” असं म्हणत माधुरी दीक्षित गौतमी पाटील आणि शिव ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पांना सुरुवातीलाच रंगत आणणार आहे. सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात हे दोघे हॉटसीटवर विराजमान होणार आहेत. माधुरीचं दिलखुलास सूत्रसंचालन, पाहुण्यांचे रंगतदार किस्से आणि तिच्याच फर्माइशीवर गौतमी सादर करणार असलेली ‘पाटलांचा बैलगाडा’ची हुकस्टेप, अशा मनोरंजनानं भरलेल्या मैफलीचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

‘कोण होणार करोडपती’मध्ये सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले, रेणुका शहाणे, प्रिया बेर्डे आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांसोबतच्या मनमोकळ्या गप्पांमधून माधुरीनं अनेक खास क्षण खुलवले आहेत. आता गौतमी आणि शिवसोबतही तिचा तितकाच सहज आणि खेळकर अंदाज पाहायला मिळणार आहे. निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून आलेल्या गौतमीच्या मराठमोळ्या लूकचं माधुरी कौतुक करणार असून, शिवच्या सहभागानं या गप्पांना आणखी रंग चढणार आहे.

या भेटीतील खास क्षण ठरणार आहे तो माधुरीनं गौतमीकडे केलेल्या एका फर्माइशीचा! गप्पांदरम्यान माधुरी तिला ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्याची हुकस्टेप करून दाखवण्यास सांगणार आहे. गौतमीही क्षणाचाही विलंब न लावता हॉटसीटवर बसल्या-बसल्याच आपल्या खास अंदाजात ठेका धरणार आहे. तिची हुकस्टेप पाहून माधुरी टाळ्या वाजवत दाद देणार असून, दोघींमधील हा उत्स्फूर्त संवाद मैफलीची रंगत आणखी वाढवणार आहे.

गौतमीच्या या नृत्याची झलक सोशल मीडियावरही लक्ष वेधून घेत आहे. माधुरीची फर्माइश आणि गौतमीचा ठेका यामुळे प्रश्नोत्तरांच्या खेळाला नृत्याचा तडकाही मिळणार आहे. आता गौतमी आणि शिव माधुरीच्या प्रश्नांना कशी उत्तरं देणार आणि गप्पांमधून आणखी कोणते किस्से उलगडणार, हे पाहणं रंजक ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande