
परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी आणि चोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल करीत 6 लाख 10 हजार 826 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलिस अधिक्षक चिखले, पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने परभणी हद्दीत एका विधीसंघर्षग्रस्त बालकास व त्याच्या तीन साथीदारास ताब्यात घेतले. दर्गाह रस्त्यावरील जामकर विद्यालयाच्या पाठीमागील मैदानातून ताब्यात घेतलेल्या या तीघांना विश्वासात घेतले तेव्हा त्यांनी घरफोडी केल्याबद्दल कबुली दिली. नवा मोंढा, पालम, ताडकळस, जिंतूर, चारठाणा, सेलू, दैठणा व जालना जिल्ह्यातील चंदनजीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने नऊ गुन्हे केल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान, या पथकाने या टोळीकडून 6 लाख 10 हजार 826 रुपयांचे सोने व नगदी रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत फौजदार चंदनसिंह परिहार, जीपीएसआय मधुकर चट्टे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुग्रीव केंद्रे व नलेश भूजबळ, हवालदार केशव लटपटे, लक्ष्मण कांगणे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, नेताजी गिते, सुनील राठोड, उमेश चव्हाण, विश्वास बहुरे यांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis