
रत्नागिरी, 28 ऑक्टोबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे डेरवण येथील एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अॅकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा अत्यंत चुरशीच्या आणि उत्साही वातावरणात झाली. या प्रतिष्ठेच्या चाचणीत जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या १७२ क्रीडापटूंनी वेगवेगळ्या मैदानी प्रकारांमध्ये आपला कस लावला.
या स्पर्धेतून सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या १३ उदयोन्मुख खेळाडूंची आगामी राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत ‘निडजॅम’ ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार असून, या स्पर्धेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ गटातील गुणवंत खेळाडूंना थेट राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची आणि आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम आणि उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या यशस्वी क्रीडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी संघटनेचे सचिव संदीप तावडे यांच्यासह सैफन चरके, अविनाश पवार आणि शिवा माळी यांनी विशेष मेहनत घेतली. ‘खेलो इंडिया’चे मार्गदर्शक प्रशिक्षक अविनाश पवार यांनी स्पर्धेतील प्रत्येक प्रकारातील गुणवत्ता पडताळली. विविध स्पर्धा प्रकारांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांवर झेप घेणाऱ्या सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्रे बहाल करून गौरविण्यात आले.
ट्रायथलोन ‘अ’ गटात मुलांमध्ये यश शिगवण, सार्थक सुतार व निदिश वारे यांनी तर मुलींमध्ये अनुष्का राणे, आरोही शिर्के व स्वराली गोवळकर यांनी बाजी मारली. ट्रायथलोन ‘ब’ गटात मुलांमधून दक्ष हातिसकर, शिवम पांचाळ व तहा कोतवडेकर आणि मुलींमधून आर्या भुवड, तनिशा मुनघाटे व गार्गी भुवड यांनी यश संपादन केले. ट्रायथलोन ‘सी’ प्रकारात मुलांमध्ये आदित्य गजमल, अर्णव चोरगे व सार्थक वीर तर मुलींमध्ये सौम्या सरफरे, संस्कृती घुमे व सान्वी गोताड अव्वल ठरले. ६० मीटर धावण्याच्या शर्यतीत वेदांग चितळकर, रोमित जाधव व पार्थ मोरे यांनी आणि मुलींमध्ये वेदिका जगदाळे, सान्वी चव्हाण व स्वरा उपशेटे यांनी आगेकूच केली. ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वेदांत पाटील, आर्यन मेस्त्री व राज कदम यांनी आणि मुलींमध्ये चिन्मयी शिगवण, इच्छा राजभर व स्वरा उपशेटे यांनी यश खेचून आणले.
८० मीटर हर्डल्समध्ये मुलांमधून आदित्य पातेरे, वेदांग चितळकर व मंथन दुडे तर मुलींमधून अस्मिता पळसमकर, इच्छा भिंगे व श्रेया बने चमकले. मैदानी उडी प्रकारांमध्ये लांब उडीत मंथन वारे, सोहम आंबेडे व समर्थ नांदलस्कर आणि मुलींमध्ये वेदिका जगदाळे, क्रांती कांबळे व आसावी मोरे यांनी यश पटकावले. उंच उडीत आदित्य पातेरे, सोहम कुळ्ये व मोहम्मद अन्सारी यांनी तर मुलींमध्ये सान्वी चव्हाण, आर्या जाधव व निधी शिगवण यांनी आघाडी घेतली. गोळाफेकीत नूर अन्सारी, साज जाधव व राज कदम आणि मुलींमध्ये दानिया जुवाले, शर्वरी कदम व संस्कृती मानकर विजेते ठरले. भालाफेक प्रकारात नूर अन्सारी, असद शहा व अब्दुल शेख तर मुलींमध्ये अंतरा चव्हाण, शमिका पवार व दानिया जुवाले यांनी यश मिळवले. याशिवाय अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या पेन्टाथलॉन प्रकारात मुलांमध्ये सार्थक धामणे व स्वराज गुरव तर मुलींच्या गटात वेदिका यादव यांनी दमदार बाजी मारली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी