जांभूळबेट विकासासाठी १८५ कोटींचा निधी द्या -आमदार डॉ. गुट्टेंची केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे मागणी
परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। पालम तालुक्यातील निसर्गसंपन्न जांभूळबेट पर्यटनस्थळाच्या शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी देऊन १८५.१६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. र
-आमदार डॉ. गुट्टे यांची केंद्रीय पर्यटनमंत्री शेखावत यांच्याकडे मागणी


परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।

पालम तालुक्यातील निसर्गसंपन्न जांभूळबेट पर्यटनस्थळाच्या शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी देऊन १८५.१६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन केली आहे.

पालम तालुक्यातील जांभूळबेट हे निसर्गसौंदर्याने नटलेले पर्यटनस्थळ असून, त्याच्या नियोजनबद्ध विकासातून परिसरात पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. योग्य पायाभूत सुविधा, आधुनिक सोयीसुविधा आणि पर्यावरणपूरक नियोजनाच्या माध्यमातून या स्थळाचा विकास झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, अशी भूमिका आमदार गुट्टे यांनी मांडली. पर्यटन विकास हा केवळ एखाद्या स्थळाचे सुशोभीकरण करण्यापुरता मर्यादित नसून, त्यातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, लघु व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीची संधी मिळणे आणि परिसरातील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होणे महत्त्वाचे आहे. जांभूळबेटचा नियोजनबद्ध विकास झाल्यास या भागाची पर्यटन क्षेत्रातील ओळख व्यापक होण्यासह ग्रामीण विकासालाही चालना मिळू शकते, असे त्यांनी निवेदनात नमूद केले. जांभूळबेटच्या विकासासाठी निसर्गसंवर्धन, पर्यावरणाचा समतोल आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधताना परिसरातील नैसर्गिक संपत्तीचे जतन होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे आमदार गुट्टे यांनी अधोरेखित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande