
परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। जिंतूर रस्त्यावरील वळण रस्त्यालगत येलदरी जलाशयाच्या जलवाहिनीवरील वॉल लिकेज झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयावरील पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीवर जिंतूर रस्त्यावर वळण रस्त्यावर सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक वॉल लिकेज झाला. त्याचा परिणाम त्या वॉलमधुन मोठ्या प्रमाणावर, मोठ्या दाबाने पाणी वाहू लागले. दुपारी साडेअकरा पर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागास त्या गोष्टीचा थांगपत्ताही नव्हता. काहींनी तो प्रकार नगर अभियंत्यांना कळविल्यानंतर कासवगतीने हालचाली सुरु झाल्या अन् दुपारी त्या लिकेजच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्या गेले. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे पालिका सदस्य विश्वजित बुधवंत, डॉ. केदार खटींग, गणेश टाक, रितेश जैन, अद्वैत पार्डीकर यांच्यासह जिजा थोरात, शंकर आजेगांवकर, श्रीपाद दैठणकर आदींनी घटनास्थळाची पाहणी केली व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर थेंब न थेंब पाण्याचे महत्व ओळखून आगामी काळात अशा घटना घडू नयेत, अशी ताकीद पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांना दिली.
जेसीबी मशीनचा धक्का लागल्याने वॉल लिकेज...
जिंतूर रस्त्यावरील वळण रस्त्यावर एका ठिकाणी प्लॉटींगचे काम सुरु असतांना तेथील जेसीबी मशीनचा धक्का लागल्याने पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीवरील वॉल लिकेज झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. दरम्यान, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बेग यांनी या संदर्भात आपण पंचनामा केला आहे व त्या संबंधीचा अहवालही वरिष्ठांना सादर केल्याची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis