
ठाणे, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
अल्-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. यापूर्वी ही पाणीकपात प्रत्येक बुधवारी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता या नियोजनात बदल करण्यात आला असून, बुधवारऐवजी दिनांक 02/11/2026 पासून प्रत्येक सोमवारी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. यांच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनात हा बदल करण्यात आला आहे.
याबाबत दिनांक 28/10/2026 रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात स्टेम वॉटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, ठामपाचे व स्टेम प्राधिकरणाचे अधिकारी यांचे समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत दर महिन्याच्या बुधवार ऐवजी प्रत्येक सोमवारी शटडाऊन घेवून पाणी कपात करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला.
राज्य शासनाने अल्-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, उपलब्ध जलसाठ्याचा योग्य विनियोग करणे आणि पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.
यापूर्वी बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले होते; मात्र दिनांक 02/11/2026 पासून प्रत्येक सोमवारी पाणीकपात होणार असून नागरिकांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी. प्रत्येक सोमवारी करण्यात येणाऱ्या पाणीकपातीचा परिणाम घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, ईटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
नागरिकांनी पाणीकपातीच्या कालावधीपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि या नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर