
* राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या सर्वसाधारण परिषदेची 93वी बैठक संपन्न
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकारातून समृद्धी' या संकल्पनेला साकार करण्याच्या तसेच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणाऱ्या आणि त्यांना सामावून घेणाऱ्या सहकार-आधारित विकासाला गती देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) सर्वसाधारण परिषदेची 93वी बैठक आज नवी दिल्लीतील महामंडळाच्या मुख्यालयात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एनसीडीसी’ची आर्थिक आणि संस्थात्मक कामगिरी, सहकारी क्षेत्रातील वित्तपुरवठ्याचा विस्तार, नवीन बहु-राज्यीय सहकारी संस्थांचा विकास, ग्रामीण उपजीविका बळकट करणे आणि महामंडळाच्या भविष्यातील कृती आराखड्याच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीला संबोधित केले. एनसीडीसीने गेल्या सुमारे पाच वर्षांत असामान्य कामगिरी केल्याचे शाह यांनी सांगितले. महामंडळाने केवळ आर्थिक कामगिरी आणि निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेतच उल्लेखनीय प्रगती केली नाही, तर प्रति कर्मचारी अधिक नफा, कर्ज मंजुरी आणि वितरणाचा विस्तार तसेच निव्वळ अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) अर्थात थकित कर्जे शून्य राखणे यांसारखी महत्त्वपूर्ण कामगिरीही केल्याचे त्यांनी सांगितले. एनसीडीसीने आता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित केल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. लडाख आणि ईशान्येकडील लहान राज्यांसारख्या दुर्गम भागांमध्ये कार्यालयांचा विस्तार करणे, हे सहकारी चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही ते म्हणाले. अमित शाह यांनी या यशाबद्दल महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की, सहकार हा मर्यादित भांडवल उपलब्ध असणारे लहान शेतकरी, पशुपालक, ग्रामीण महिला, मासेमारी करणारे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्या सामूहिक शक्तीला देशाच्या विकासाशी जोडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. सहकारी संस्था मर्यादित भांडवलासह मोठ्या संख्येने लोकांना एकत्र आणू शकतात आणि उत्पादन, प्रक्रिया, विपणन तसेच उत्पन्नातील सुधारणा यांच्या नव्या संधी निर्माण करू शकतात. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, सहकाराच्या तत्वांचा व्यावसायिक व्यवस्थापनाशी योग्य मेळ घालून जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक संस्थांची उभारणी करता येते हे अमूल, इफ्को,लिज्जत पापड आणि देशभरातील इतर असंख्य यशस्वी संस्थांनी दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांच्या मानांकनात भारतीय सहकारी संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा संदर्भ देत ते म्हणाले की देशातील संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
एनसीडीसीसाठी येत्या 25 वर्षांतील वाटचालीचा व्यापक आराखडा तयार करण्याचे निर्देश केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी दिले. ते म्हणाले की, महामंडळाची विद्यमान संरचना, भांडवल उभारणीचे पर्यायी मार्ग, सहकारी संस्थांचा सहभाग, वित्तीय स्वायत्तता, संघटनात्मक सुधारणा तसेच भविष्यकालीन व्यवसाय संधी यांची तपासणी करण्यासाठी सहकार क्षेत्रातील अनुभवी प्रतिनिधी आणि व्यावसायिक तज्ञ यांचा एक गट स्थापन करायला हवा. या मुद्द्यांवर आधारलेली कार्यशाळा आयोजित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. अमित शाह म्हणाले की, या संदर्भातील तपशीलवार सादरीकरण तसेच चर्चेसाठी 31 मार्च 2027 नंतर एका विशेष बैठकीचे आयोजन केले जावे जेणेकरुन डिसेंबर 2027 पर्यंत आवश्यक निर्णयांच्या संदर्भात प्रगती करता येईल.
येत्या काही वर्षांमध्ये एनसीडीसीतर्फे केल्या जाणाऱ्या वित्तीय वितरणामध्ये वेगाने वाढ करण्याच्या गरजेवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिक भर दिला. आर्थिक वर्ष 2026–27 साठी 1.70 लाख कोटी रुपये, आर्थिक वर्ष 2027–28 साठी 2.10 लाख कोटी रुपये तर आर्थिक वर्ष 2028–29 साठी 2.50 लाख कोटी रुपये या नियोजित उद्दिष्टांचा संदर्भ देत त्यांनी पुढील वर्षांसाठी अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्याचे आवाहन केले. आर्थिक वर्ष 2029-30 साठी 3.50 लाख कोटी रुपयांचे तर आर्थिक वर्ष 2030–31 साठी 3.5 लाख कोटी रुपयांचे वितरण करण्याच्या दृष्टीने काम करण्यावर त्यांनी अधिक भर दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी