
नांदेड, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। हिंगोली उड्डाणपुलाजवळील खालसा फायनान्सच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे (वय ४०) यांचा मृतदेह आढळल्याप्रकरणी नऊ आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये फायनान्स चालकाचे अध्यक्ष यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे.
या घटनेनंतर अपहरण, डांबून ठेवणे आणि खून केल्याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथकाने यापूर्वी अटक केलेल्या सहा आणि त्यानंतर पकडलेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर केले.
विशेष तपास पथकाचे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वेंजने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, विठ्ठल दुरपडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची कार्यवाही केली.
कोठडीची मागणी करताना सरकारी वकील अॅड. के. एम. पठ्ठेबहादुर आणि पोलीस उपअधीक्षक वेंजने यांनी तपासातील बाबी न्यायालयासमोर मांडल्या.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis