
जळगाव, २९ ऑक्टोबर (हिं.स.) : मंगरूळ धरणातून गाळ काढण्यासाठी जेसीबीचा वापर केल्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना रावेर तालुक्यातील वनरक्षकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २७) असे संशयित वनरक्षकाचे नाव आहे. त्याने जेसीबीद्वारे गाळ काढणे आणि ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक करण्याच्या कामासाठी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यापैकी २० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील तक्रारदार रावेर येथील अर्थमूव्हर्स एजन्सीचे व्यावसायिक असून, त्यांच्याकडे स्वतःचे जेसीबी मशीन आहे. तक्रारदारांच्या परिचित व्यक्तीने स्वतःच्या तसेच नातेवाइकांच्या नावे मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ काढण्याचा आणि त्याची वाहतूक करण्याचा परवाना पाटबंधारे उपविभाग, रावेर येथून घेतला होता.संबंधित ठिकाण वनरक्षक जगदाळे याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने त्याने या कामाच्या मोबदल्यात पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्यासाठी २० हजार रुपये, तर ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक करण्यासाठी ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
चहाच्या हॉटेलमध्ये मागणीची पडताळणी
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने रावेर शहरातील छोरिया मार्केट परिसरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या वेळी जेसीबीद्वारे गाळ काढण्याच्या कामासाठी २० हजार रुपयांची मागणी केल्याचे आणि ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.त्यानंतर एसीबीच्या पथकाने रावेर-बऱ्हाणपूर मार्गावरील साईनाथ ज्यूस सेंटर येथे सापळा रचला. तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना वनरक्षक जगदाळे याला पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार किशोर महाजन तसेच पोलीस अंमलदार भूषण पाटील, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांचा सहभाग होता. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर