सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस बंद
Order to close Trimbakeshwar temple
Order to close Trimbakeshwar


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी रामकुंडावर ध्वजारोहण

कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा

नाशिक, २९ ऑक्टोबर (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त तीर्थ सामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा कार्यक्रम संपेपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी पार पडणार आहे. नाशिक येथील रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्यांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीमुळे सुरक्षा व्यवस्था कडक

त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, व्हीव्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि गर्दीचे व्यवस्थापन करणे यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत.

अधिकृत दर्शन पासधारकांनाच प्रवेश

निर्धारित कालावधीत त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक रहिवाशांना वगळता बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद राहणार आहे. जिल्हा प्रशासन किंवा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून वितरित करण्यात आलेल्या अधिकृत दर्शन पासधारकांनाच या कालावधीत प्रवेश दिला जाणार आहे. अधिकृत पास नसलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टमध्ये समन्वय

राष्ट्रपतींच्या ३० आणि ३१ ऑक्टोबरच्या दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण), त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि दर्शनासाठी येण्यापूर्वी निर्बंधांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande