नागपुरातील विधानभवन उडविण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
दारूच्या नशेत डायल ११२ वर दिली खोटी माहिती खामगाव, 29 ऑक्टोबर (हिं.स.) : नागपूर येथील विधानभवन आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देत पोलिस यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या एका इसमाविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरीच्या
अटक लोगो


दारूच्या नशेत डायल ११२ वर दिली खोटी माहिती

खामगाव, 29 ऑक्टोबर (हिं.स.) : नागपूर येथील विधानभवन आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देत पोलिस यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या एका इसमाविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरीच्या १३ हजार ५०० रुपयांवरून ट्रक मालक व सहकाऱ्यांसोबत झालेल्या वादातून आणि दारूच्या नशेत त्याने हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.२९ ते मध्यरात्री १.४४ या कालावधीत खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार किरण सुरेश राऊत हे नाइट व डायल ११२ कर्तव्यावर कार्यरत होते. याचदरम्यान डायल ११२ वर एका व्यक्तीने फोन करून नागपूर येथील विधानभवन उडविण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच, एमएच ४६ सीयू २२९८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये आरडीएक्स भरून चार जण नागपूरच्या दिशेने जात असल्याचे त्याने सांगितले.

या गंभीर माहितीमुळे पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तपासादरम्यान संबंधित व्यक्ती खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा फाटा परिसरात आढळून आली. चौकशीत त्याचे नाव संजय हरिसिंग यादव (वय ४१, रा. प्लॉट क्रमांक ४, अमर संजय सोसायटी, मनीष नगर, नागपूर) असल्याचे समोर आले.पोलिस चौकशीत संजय यादव याने आपण ट्रकवर चालक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. मुंबई येथून ऑफसेट प्रिंटिंग मशीन व चटईचा माल घेऊन ट्रक निघाला होता. या कामाची १३ हजार ५०० रुपये मजुरी मिळण्यावरून ट्रक मालक व सहकाऱ्यांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर त्याला वाटेतच ट्रकमधून उतरविण्यात आले. याचा राग मनात धरून त्याने दारूच्या नशेत डायल ११२ वर फोन करून विधानभवन उडविण्याची खोटी माहिती दिली. ट्रक थांबविला जावा आणि पोलिसांची मदत मिळावी, या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले.

खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. आपत्कालीन पोलिस यंत्रणेला खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २१७ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande