राजकोट विमानतळाच्या धावपट्टीजवळ आगीचा भडका; एअर इंडियाचे विमान वडोदऱ्याकडे वळवले
राजकोट, 29 ऑक्टोबर (हिं.स.) : गुजरातच्या राजकोट येथील हिरासर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी फटाके फोडले जात असताना धावपट्टीजवळील वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि धावपट्टीवरील दृश्य
संग्रहित लोगो


राजकोट, 29 ऑक्टोबर (हिं.स.) : गुजरातच्या राजकोट येथील हिरासर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी फटाके फोडले जात असताना धावपट्टीजवळील वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि धावपट्टीवरील दृश्यमानता कमी झाली. त्यामुळे दिल्लीहून राजकोटला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे वडोदरा विमानतळाकडे वळवण्यात आले. वडोदरा येथे विमानाचे सुरक्षितरीत्या लँडिंग करण्यात आले.

हिरासर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीपासून पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी फटाके फोडले जात होते. याच वेळी फटाक्यांची ठिणगी जवळच्या वाळलेल्या गवतावर पडल्याने आग लागली. काही वेळातच आगीने वेग घेतला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे धावपट्टीवरील दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली.घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले.

विमानाला हवेत घ्यावे लागले चार फेरे

दिल्लीहून राजकोटला येणारे एअर इंडियाचे सकाळचे विमान नियोजित वेळेनुसार सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी राजकोट येथे पोहोचणार होते. मात्र, धावपट्टीवर धुराचे प्रमाण वाढल्याने विमान वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी) सुरक्षित लँडिंगसाठी परवानगी दिली नाही.प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वैमानिकाला विमानाने हवेत चार फेऱ्या माराव्या लागल्या. त्यानंतरही दृश्यमानतेत सुधारणा न झाल्याने विमान वडोदरा विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. विमानातील १०० हून अधिक प्रवाशांनी यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला.राजकोट विमानतळावरील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हे विमान वडोदरा येथून पुन्हा राजकोटच्या दिशेने रवाना झाले. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ते राजकोट विमानतळावर पोहोचले. त्यानंतर दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी हे विमान राजकोटहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.या संपूर्ण प्रकारामुळे १०० हून अधिक प्रवाशांना अनेक तास विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागला.

विमानतळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे विमानतळ परिसरात पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि धावपट्टीच्या आसपासच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी फटाके फोडताना आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन योग्य खबरदारी घेतली जाते का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.दरम्यान, या घटनेबाबत विमानतळ प्रशासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवेदन जारी झाल्याची माहिती उपलब्ध नाही. ------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande