
कीव, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।युक्रेनमधील निप्रो रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी रशियाने केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. स्थानकावरील ज्या फलाटावर रेल्वेगाडी उभी होती, त्याला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. युक्रेनियन
रेल्वेने टेलिग्रामवरील पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक जेट इंजिनवर चालणाऱ्या ड्रोनच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला. या ड्रोनने निप्रो-जापोरिझिया मार्गावरील ८६६ क्रमांकाच्या रेल्वेगाडीला लक्ष्य केले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिसरात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला असतानाही फलाटावर मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढला.
निप्रोचे महापौर बोरिस फिलातोव्ह यांनी या हल्ल्याला शहरासाठी मोठी शोकांतिका म्हटले आहे. रशियन ड्रोनने जाणूनबुजून सामान्य नागरिकांच्या विद्युत प्रवासी रेल्वेगाडीला लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी केला.या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला रशियाविरोधात कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले.‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये झेलेन्स्की यांनी प्रश्न उपस्थित केला, “तणाव कमी करण्याऐवजी, काही रशियन उद्योगपती आणि ऊर्जा क्षेत्रावरील निर्बंध हटवल्यानंतर रशियाने आमच्या नागरिकांवर किती दहशतवादी हल्ले केले आहेत?”
युक्रेनच्या सरकारी रेल्वे ऑपरेटरनुसार, गेल्या महिन्यात रविवारी युक्रेन-पोलंड सीमेच्या जवळ एका रशियन ड्रोनने रेल्वेगाडीवर हल्ला केला होता. ब्रिटन आणि स्वीडनच्या माजी पंतप्रधानांसह अनेक वरिष्ठ अधिकारी त्या परिसरातून गेले होते, त्याच वेळी ही घटना घडली.
रशियाचे नवीन जेट इंजिनवर चालणारे ड्रोन पाडणे कठीण मानले जाते. या ड्रोनच्या माध्यमातून शॉपिंग सेंटर्स, पेट्रोल पंप, वीज प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे. रेल्वे व्यवस्थाही या हल्ल्यांपासून सुरक्षित राहिलेली नाही. युक्रेनच्या महत्त्वाच्या वाहतूक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या रशियाच्या वाढत्या मोहिमेचे प्रतिबिंब या हल्ल्यातून दिसून येते. युक्रेनच्या सरकारी रेल्वे ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत रशियाने रेल्वेच्या १,७०० हून अधिक सुविधांवर हल्ले केले आहेत. यामध्ये रेल्वे स्थानके, इंजिने आणि प्रवासी डबे यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode