अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात दोन हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; तीन जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन , 30 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेच्या ओरेगॉन राज्याच्या वायव्य भागात गुरुवारी एका विमानतळाजवळ हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. यमहिल काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्टलँड शहराच्या नै
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात दोन हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; तीन जणांचा मृत्यू


वॉशिंग्टन , 30 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेच्या ओरेगॉन राज्याच्या वायव्य भागात गुरुवारी एका विमानतळाजवळ हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला.

यमहिल काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्टलँड शहराच्या नैऋत्येला सुमारे ४० मैल अंतरावर असलेल्या मॅकमिनविले म्युनिसिपल विमानतळाजवळ स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत यमहिल काउंटीचे शेरीफ सॅम इलियट यांनी सांगितले की, एका हेलिकॉप्टरमध्ये दोन जण प्रवास करत होते. त्यामध्ये टेक्सासमधील एक उड्डाण प्रशिक्षक आणि ब्रिटनमधील एक प्रशिक्षणार्थी वैमानिक यांचा समावेश होता. तर दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये ओरेगॉनमधील न्यूबर्ग येथील एक वैमानिक एकटाच होता.शेरीफ कार्यालयाने नागरिकांना या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच या गंभीर दुर्घटनेच्या परिस्थितीचा सामना करताना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेच्या तपासाचे नेतृत्व राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (एनटीएसबी) करत आहे. तसेच एफएएकडूनही या घटनेचा तपास सुरू आहे.अपघातग्रस्त हेलिकॉप्टरपैकी एक हेलिकॉप्टर 'जेरी ट्रिम्बल हेलिकॉप्टर्स' या कंपनीचे होते. ही कंपनी उड्डाण प्रशिक्षण संस्था आणि खासगी हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर देण्याची सेवा चालवते. या दुर्घटनेत आपले एक हेलिकॉप्टर सहभागी असल्याच्या वृत्ताला कंपनीने दुजोरा दिला आहे.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “आज दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेत आमचे एक हेलिकॉप्टर सहभागी असल्याचे सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. या घटनेत सहभागी असलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांप्रति आम्ही सहवेदना व्यक्त करतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande