
माद्रिद, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।स्पेनमध्ये बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी भीषण रेल्वे अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. युरोपच्या आधुनिक इतिहासातील सर्वात भीषण रेल्वे दुर्घटनांपैकी ही एक मानली जात आहे. यापूर्वी नऊ महिन्यांपूर्वीही स्पेनमध्ये दोन अतिवेगवान रेल्वेगाड्यांची टक्कर झाली होती. त्या दुर्घटनेत ४६ जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा झालेल्या या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अपघातानंतर हजारो नागरिकांनी पंतप्रधान पेद्रो सांचेझ आणि परिवहनमंत्री ऑस्कर पुएंते यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
स्पेनच्या प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, रात्रभरात स्पेनची राजधानी माद्रिद येथील परिवहन मंत्रालयाच्या इमारतीबाहेर सुमारे १,५०० आंदोलक जमा झाले. त्यांनी संबंधित मंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. वृत्तानुसार, आंदोलकांनी पोलिसांवर बाटल्या आणि ज्वालाग्राही फटाके फेकले. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे किंवा कोणाला अटक करण्यात आल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
स्पेनमधील या आंदोलनांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. या व्हिडिओंमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटी दिसत आहेत. अपघातानंतर प्रशासनाने परिस्थिती कशा प्रकारे हाताळली, यावर आंदोलक प्रश्न उपस्थित करत आहेत. आंदोलकांच्या हातात फलकही दिसून आले. त्यावर ‘गुन्हेगारांनो, १९७८ ची व्यवस्था संपवा’ असा मजकूर लिहिलेला होता.
राजधानी माद्रिदमध्ये पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू केली, तेव्हा आंदोलकांनी ‘ऑस्कर पुएंते, मृत्यूचा मंत्री’ अशा घोषणा दिल्या. माध्यमांच्या वृत्तानुसार, स्पेनमध्ये आज रेल्वेचालक संपावर जाण्याची शक्यता आहे. स्पॅनिश रेल्वेचालक संघटना ‘सेमाफ’ने सांगितले की, रेल्वे सुरक्षेच्या संरक्षणासाठी हा निषेध करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode