परभणी : धसाडी परिसरात ७६ लाखांचा गांजा जप्त
परभणी, ३ ऑक्टोबर (हिं.स.) : धसाडी परिसरातील एका शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. दैठणा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तब्बल १५३ किलो गांजा जप्त केला असून, या
परभणी : धसाडी परिसरात ७६ लाखांचा गांजा जप्त


परभणी, ३ ऑक्टोबर (हिं.स.) : धसाडी परिसरातील एका शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. दैठणा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तब्बल १५३ किलो गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ७६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैठणा पोलिसांना धसाडी परिसरातील एका शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. शेताची पाहणी केली असता गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ही झाडे ताब्यात घेऊन त्यांचे वजन केले असता एकूण १५३ किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईनंतर संबंधित व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे या लागवडीबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दैठणा पोलीस करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक एन. एल. रिठे, सहायक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत, पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार यांच्यासह हवालदार विठ्ठल कुंडगीर, ज्ञानेश्वर चोपडे, विनोद मुळे, अमोल डुबे, संजय सानप, लक्ष्मीकांत कश्यप, अशोक रसाळ तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले.

या कारवाईमुळे धसाडी परिसरात गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपासही पोलीस करीत आहेत.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande