रायगड - बनावट ट्रॅफिक चलन ॲपद्वारे माणगावात ६.६० लाखांची सायबर फसवणूक
रायगड, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट ‘ट्रॅफिक आरटीओ चलन’ नावाची फाईल उघडणे एका नागरिकाच्या चांगलेच अंगलट आले असून, अज्ञात सायबर भामट्याने बँक खात्यावर डल्ला मारत तब्बल ६ लाख ६० हजार ७८७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घट
Cyber fraud of ₹6.60 lakh in Mangaon via fake traffic challan app


रायगड, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। व्हॉट्सॲपवर पाठवलेली बनावट ‘ट्रॅफिक आरटीओ चलन’ नावाची फाईल उघडणे एका नागरिकाच्या चांगलेच अंगलट आले असून, अज्ञात सायबर भामट्याने बँक खात्यावर डल्ला मारत तब्बल ६ लाख ६० हजार ७८७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे जामा मशिद मोहल्ला (मोर्बा) येथील फिर्यादी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवला. यामध्ये ट्रॅफिक पोलिसांचे प्रलंबित दंड चलन असल्याचे भासवून ‘ट्रॅफिक आरटीओ चलन’ नावाची एक एपीके (APK) लिंक देण्यात आली होती. फिर्यादी यांनी सदर लिंकवर क्लिक करून फाईल डाऊनलोड केली.

सदर ॲप्लिकेशन इन्स्टॉल होताच सायबर गुन्हेगाराने फिर्यादी यांचा मोबाईल हॅक केला. मोबाईलचा अनधिकृत ॲक्सेस मिळवून फिर्यादी यांच्या आयसीआयसीआय बँक (मोर्बा शाखा) खात्यातून फिर्यादीच्या परस्पर आणि कोणत्याही संमतीशिवाय टप्प्याटप्प्याने तब्बल ६,६०,७८७/- रुपये परस्पर इतरत्र वळवून फसवणूक केली. खात्यातून अचानक पैसे कापले गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी तात्काळ माणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

या तक्रारीवरून माणगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० चे कलम ६६(सी) आणि ६६(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती आंधळे करीत आहेत.

नागरिकांना सायबर पोलिसांचे आवाहन : अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांक किंवा मेसेजवरून येणाऱ्या कोणत्याही अज्ञात लिंक्स, प्रामुख्याने .apk फॉरमॅटमधील फाईल्स डाऊनलोड करू नका. वाहतूक पोलीस कधीही व्हॉट्सॲपवर थेट ॲप डाऊनलोड करण्याची लिंक पाठवत नाहीत. अशा प्रकारची कोणतीही फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande