
नांदेड, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात गहाळ तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सायबर पोलीस व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी तांत्रिक तपास आणि केंद्र शासनाच्या CEIR (Central Equipment Identity Register) प्रणालीचा प्रभावी वापर करत तब्बल ३०५ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत ४१ लाख ३१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा तसेच विविध भागांतून नागरिकांचे गहाळ अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मोबाईलचे IMEI क्रमांक, पोलीस अभिलेख आणि CEIR प्रणालीतील उपलब्ध माहितीची पडताळणी करून शोधमोहीम राबविण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis