परभणीत तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल; 4 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त
परभणी, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील मंगरूळ (ता. घनसावंगी) येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध घरफोडीच्या गुन्ह्यांतील 30.20 ग्रॅम
परभणीत तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल; 4 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त


परभणी, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।

घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील मंगरूळ (ता. घनसावंगी) येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून विविध घरफोडीच्या गुन्ह्यांतील 30.20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यांची बाजारभावानुसार अंदाजे किंमत 4 लाख 32 हजार 200 रुपये आहे.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती घेत असताना आरोपी हा त्याच्या मंगरूळ येथील राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पथकाने मंगरूळ येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले.

आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने साथीदार यांच्या मदतीने परभणी जिल्ह्यातील पालम आणि चुडावा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून 30.20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पालम पोलिस ठाण्यातील दोन आणि चुडावा पोलिस ठाण्यातील एक, अशा एकूण तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी पालम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, मधुकर चट्टे, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, रंगनाथ दुधाटे, नेताजी गीते, गजानन क्षीरसागर, हनुमान ढगे आणि विलास बहुरे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande