
पुणे, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३ नोव्हेंबरला बारामती दौऱ्यावर येणार असून, विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळ’ मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी दिली.
विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात विद्यार्थ्यांना ध्यान, आत्मचिंतन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘प्रेरणास्थळ’ची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रात भव्य डोम साकारण्यात आला असून, त्यामध्ये भगवान गौतम बुद्धांचा चार टन वजनाचा पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना शांत आणि प्रसन्न वातावरणात ध्यान व आत्मचिंतन करता यावे, हा ‘प्रेरणास्थळ’ उभारण्यामागील उद्देश आहे. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी त्यांच्या छायाचित्रांसह कार्याची माहिती येथे प्रदर्शित केली जाणार आहे.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांच्यासह विविध व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची माहिती या केंद्रात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्या विचारांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, अशी या संकल्पनेमागील भूमिका असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या बारामती दौऱ्यात विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्राचीही पाहणी आणि सादरीकरण होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु