
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर (हिं.स.) । अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकांना कारवाईची भीती दाखवत पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार चिपळूण शहरात उघडकीस आला आहे. हॉटेल बंद करण्याची तसेच दंडात्मक कारवाईची धमकी देत पाच हजार रुपये ऑनलाइन पाठविण्याची मागणी करण्यात आली.
चिपळूणमधील महालक्ष्मी चायनीज सेंटरचे चालक रणवीर सावंत यांना संदीप शिंदे नावाच्या व्यक्तीने फोन केला. आपण अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने हॉटेलचे आवश्यक परवाने आणि कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल नसल्याचा दावा केला. यामुळे हॉटेल सलग २४ दिवस बंद ठेवण्यात येईल, तसेच न्यायालयात ६५ हजार ८०० रुपयांचा दंड होऊ शकतो, अशी भीती घालण्यात आली. ही कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपये ऑनलाइन पाठविण्याची मागणीही करण्यात आली.
या प्रकारामुळे सावंत चिंतेत पडले. मात्र पैसे पाठविण्यापूर्वी त्यांनी माजी नगरसेवक तथा हॉटेल व्यावसायिक संजय तांबडे यांना याबाबत माहिती दिली. तांबडे यांनी संभाषणातील संशयास्पद बाबी लक्षात घेऊन अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी परदेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी संदीप शिंदे नावाची व्यक्ती संबंधित विभागात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले.
वेळीच शहानिशा केल्यामुळे सावंत यांची संभाव्य आर्थिक फसवणूक टळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी अनोळखी व्यक्तींच्या फोनवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नयेत. सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी