
लातूर, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। ऊसतोडणीची थकबाकी चुकती करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी लातूर न्यायालयाने ऊसतोड ठेकेदार विजय मोतीराम चव्हाण (रा. नायगाव, जि. नांदेड) यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५ लाख ६० हजार ७६४ रुपयांचा दंड ठोठावत, त्यातील पाच लाख रुपये मांजरा साखर कारखान्यास देण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास आणखी दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे.
मांजरा साखर कारखान्याच्या २०१४-१५ च्या गाळप हंगामातील ऊसतोडणीपोटी ठेकेदाराकडे २ लाख ८० हजार ३८२ रुपये थकीत होते. या रकमेच्या वसुलीसाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले.
सुनावणीनंतर न्यायालयाने ठेकेदाराला शिक्षा सुनावली. या निकालामुळे ऊसतोडणीच्या आर्थिक व्यवहारांतील थकबाकी आणि धनादेश अनादर प्रकरणांचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. या प्रकरणात मांजरा साखर कारखान्याच्या वतीने अॅड. आर.डी. काळे यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis