
जळगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.) गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण आज शुक्रवारीही कायम राहिली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात बाजार सकाळी सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅममागे १ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६ हजार रुपयांची घसरण झाली. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घसरणीमुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीतील घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेतील महागाई, डॉलरची स्थिती, बाँड यील्डमधील बदल आणि भू-राजकीय तणाव यांसारख्या घटकांचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींकडे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. मध्यंतरी दरात काहीशी वाढ झाली होती. मात्र, दसऱ्यानंतर दरात घसरणीचे चित्र पाहायला मिळत आहे. या आठवड्यातही ही घसरण कायम राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४२ हजार ८०० रुपये होता. शुक्रवारी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ३०० रुपयांवर आला आहे.सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ९६ हजार रुपये होता. शुक्रवारी त्यात तब्बल ६ हजार रुपयांची घट झाली असून, चांदीचा दर प्रतिकिलो १ लाख ९० हजार रुपयांवर आला आहे.दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या काळात सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व असते. अशा वेळी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर