सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत बंद; सेन्सेक्स ३०८.४९ अंकांनी वधारला
तरीही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ४ लाख कोटी रुपयांची घट नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेली जोरदार खरेदी आणि ट्रेंट कंपनीच्या दमदार निकालांमुळे भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी तेजी राखण्
Stock market rebounds from initial lows


तरीही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ४ लाख कोटी रुपयांची घट

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेली जोरदार खरेदी आणि ट्रेंट कंपनीच्या दमदार निकालांमुळे भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी तेजी राखण्यात यश मिळवले. मात्र, बाजारातील प्रमुख निर्देशांक वधारले असले तरी मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. निवडक मोठ्या कंपन्यांच्या समभागांमधील खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या निशाणावर बंद झाले, मात्र गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ४ लाख १ हजार कोटी रुपयांची घट झाली.

शुक्रवारी बाजाराच्या सुरुवातीपासूनच चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८.६५ अंकांच्या वाढीसह ७४,१९९.६९ अंकांवर खुला झाला. मात्र, सुरुवातीच्या व्यवहारात विक्रीचा दबाव वाढल्याने तो घसरून ७४,०९९.३३ अंकांवर पोहोचला. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि निवडक मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी सुरू झाल्याने सेन्सेक्सने जोरदार उसळी घेतली. दिवसाच्या व्यवहारात तो ७४,७४२.५९ अंकांच्या उच्चांकावर पोहोचला. मात्र, या पातळीवर गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू केल्याने निर्देशांक पुन्हा घसरला. अखेरच्या तासात खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्सने सावरत ३०८.४९ अंकांची म्हणजेच ०.४२ टक्क्यांची वाढ नोंदवली आणि ७४,४५९.५३ अंकांवर व्यवहाराची समाप्ती केली.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील २७.७५ अंकांच्या वाढीसह २२ हजार ९६४.५० अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या घसरणीनंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने निफ्टीने २३,११८.१० अंकांचा उच्चांक गाठला. मात्र, त्यानंतर झालेल्या नफावसुलीमुळे तो पुन्हा २२,९०५.१० अंकांपर्यंत घसरला. अखेरच्या सत्रात झालेल्या जोरदार खरेदीमुळे निफ्टीने ११६.३५ अंकांची म्हणजेच ०.५१ टक्क्यांची वाढ नोंदवत २३,०५३.१० अंकांवर बाजार बंद केला.

क्षेत्रनिहाय व्यवहारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली. निफ्टीचा माहिती तंत्रज्ञान निर्देशांक २.३२ टक्क्यांनी वधारला. औषधनिर्माण क्षेत्राच्या निर्देशांकात १.५५ टक्क्यांची वाढ झाली. आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांकही तेजीत राहिले. दुसरीकडे, भांडवली वस्तू क्षेत्राच्या समभागांमध्ये मोठी विक्री झाल्याने हा निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक घसरला. वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू, तेल आणि वायू क्षेत्रालाही विक्रीचा फटका बसला. बँकिंग क्षेत्राचा निफ्टी बँक निर्देशांक ०.४१ टक्क्यांनी घसरला. मध्यम कंपन्यांचा निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.९३ टक्क्यांनी, तर लघु कंपन्यांचा निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक तब्बल १.८५ टक्क्यांनी घसरला.

बाजारातील या घसरणीचा सर्वाधिक फटका गुंतवणूकदारांच्या संपत्तीला बसला. गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४७८.३४ लाख कोटी रुपये होते. शुक्रवारी व्यवहार संपताना ते घसरून ४७४.३३ लाख कोटी रुपयांवर आले. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४.०१ लाख कोटी रुपयांची घट झाली.

शुक्रवारच्या व्यवहारात ट्रेंट कंपनीच्या समभागांनी ५.४४ टक्क्यांची वाढ नोंदवत सर्वाधिक तेजी दाखवली. इंडिगो ४.३३ टक्के, इन्फोसिस ३.३६ टक्के, अपोलो हॉस्पिटल्स ३.०२ टक्के आणि पॉवर ग्रिड १.९२ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, श्रीराम फायनान्सचे समभाग २.१३ टक्क्यांनी घसरले. नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि अदाणी पोर्ट्सच्या समभागांमध्येही घसरण झाली. बाजारातील एकूण चित्र पाहता प्रमुख निर्देशांकांमध्ये तेजी असली, तरी बहुतांश समभागांमध्ये विक्रीचेच वर्चस्व राहिल्याचे स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande