

महाराष्ट्र वि रेल्वे - सी के नायडू ट्रॉफी
नाशिक, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय -च्या २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीत, महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामन्यात महाराष्ट्र संघातर्फे नाशिकच्या जलदगती गोलंदाज ऋषिकेश कातकाडेने डावात ६ बळी घेतले. तर नाशिकचा डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगेने रेल्वे संघातर्फे सी. के. नायडू ट्रॉफीत पदार्पण करताना सामन्यात ३ बळी घेतले.
सोलापूर येथे झालेल्या या ४ दिवसीय सामन्यात महाराष्ट्राच्या ऋषिकेश कातकाडेने पहिल्या दिवशी ४ तर दुसऱ्या दिवशी आणखी २ असे रेल्वेच्या पहिल्या डावात एकूण ६ बळी घेतले. २२-५-८८-६. तरी देखील रेल्वेने ९ बाद ४५१ धावांचा डोंगर रचला. उत्तरादाखल महाराष्ट्राच्या पहिल्या डावात सर्वबाद १३४ च धावा झाल्या. फॉलोऑन नंतर देखील दुसऱ्या डावात महाराष्ट्राचे फलंदाज १४० पर्यंतच मजल मारू शकले. रोहन शेडगे याने रेल्वेच्या संघाकडून पहिल्या डावात २ ( १५-२-४५-२ ) व दुसऱ्या डावात १ ( ४-०-२२-१) बळी घेऊन रेल्वे संघाच्या १ डाव व १७७ धावांच्या मोठ्या विजयास हातभार लावला. (संक्षिप्त धावफलक : रेल्वे पहिला डाव - ९ बाद ४५१ - विजयी वि. महाराष्ट्र पहिला डाव - सर्वबाद १३४ व दुसरा डाव - सर्वबाद १४० )
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI