हायलो ओपन २०२६: सिंधू आणि अनमोलमध्ये रंगणार उपांत्य फेरी; लक्ष्य सेनचीही आगेकूच
बर्लिन (जर्मनी), 31 ऑक्टोबर (हिं.स.) जर्मनीमध्ये सुरू असलेल्या ''हायलो ओपन २०२६'' स्पर्धेत, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि उदयोन्मुख भारतीय बॅडमिंटनपटू अनमोल खरब यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे आता उप
पी.व्ही. सिंधू


बर्लिन (जर्मनी), 31 ऑक्टोबर (हिं.स.) जर्मनीमध्ये सुरू असलेल्या 'हायलो ओपन २०२६' स्पर्धेत, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि उदयोन्मुख भारतीय बॅडमिंटनपटू अनमोल खरब यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे आता उपांत्य फेरीत दोन भारतीय खेळाडूंमध्येच सामना पाहायला मिळणार आहे. तर लक्ष्य सेनने पुरुषांच्या एकेरी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सारलँडहॅले येथे झालेल्या या 'बीडब्ल्यूएफ सुपर ५००' स्पर्धेत, पहिला गेम गमावल्यानंतरही लक्ष्यने जोरदार पुनरागमन करत फिनलंडच्या काल्ले कोलजोनेनचा पराभव केला.

दुसरी मानांकित पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या अमाली शुल्झचा २१-१२, २१-१० असा पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. हा सामना अवघ्या २८ मिनिटांत संपला.सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने खेळावर आपले वर्चस्व राखले. तिने आपल्या प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही गेममध्ये आघाडी घेण्याची संधी दिली नाही आणि संपूर्ण सामन्यात नियंत्रण ठेवत सरळ गेममध्ये विजय मिळवला. शुल्झविरुद्धचा सिंधूचा हा दुसरा विजय आहे. याआधी या वर्षाच्या सुरुवातीला 'थायलंड ओपन'च्या उपउपांत्यपूर्व फेरीत हे दोघे आमनेसामने आले होते, तेव्हाही सिंधूने सरळ गेममध्ये विजय मिळवला होता.

दुसरीकडे, भारताच्या दोन उदयोन्मुख युवा खेळाडूंमधील चुरशीच्या लढतीत, अनमोल खरबने सहावी मानांकित उन्नती हुड्डाचा २१-१७, १८-२१, २१-१६ असा पराभव केला. हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ६८ मिनिटे चालला. अनमोल आणि उन्नती यांच्यातील 'बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर'वरील हा पहिलाच सामना होता. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. ६-६ अशा बरोबरीनंतर अनमोलने आपला खेळ उंचावला आणि २१-१७ असा गेम जिंकला.दुसऱ्या गेममध्ये उन्नतीने पुनरागमन करत १५-११ अशी आघाडी घेतली. उन्नतीने संयम राखत सलग तीन गुण मिळवले आणि सामना निर्णायक तिसऱ्या गेमपर्यंत नेला.

तिसऱ्या गेममध्येही उन्नतीने आपला वेग कायम राखत ६-३ अशी आघाडी घेतली. मात्र, अनमोलने हळूहळू पुनरागमन करत गुणांमधील अंतर १२-११ असे कमी केले आणि त्यानंतर खेळाचा वेग पूर्णपणे बदलला. १९ वर्षीय भारतीय खेळाडूने सलग आठ गुण मिळवत १९-१२ अशी भक्कम आघाडी घेतली. उन्नतीने त्यानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण अनमोलने संयम राखत २१-१६ अशा फरकाने गेम जिंकला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande