
अस्ताना (कझाकस्तान), 31 ऑक्टोबर (हिं.स.) मनीषा भानवालाने जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आणि एकूण दुसरी भारतीय ठरली आहे. कझाकस्तानमधील अल्माटी येथे झालेल्या महिलांच्या ५९ किलो वजनी गटात मनीषाने अमेरिकेच्या अबीगेल नेटचा ८-६ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. २९ वर्षीय भारतीय कुस्तीपटू पहिल्या फेरीत ६-१ ने मागे होती. दुसऱ्या सत्रात तीन मिनिटांत सात गुण मिळवून तिने विजय निश्चित केला आणि इतिहास रचला. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये १५ वर्षांनंतर भारताने मिळवलेले हे पहिले सुवर्णपदक आहे.
मनीषा व्यतिरिक्त, या स्पर्धेत तीन भारतीय महिला कुस्तीपटूंनी पदके जिंकली. नीलम सिरोहीने ५० किलो गटात, काजल धोचकने ७६ किलो गटात रौप्यपदक आणि तनु शर्माने ७२ किलो गटात कांस्यपदक जिंकले. भारताने २०२६ च्या महिला कुस्ती विश्वचॅम्पियनशिपमध्ये एकूण चार पदके जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. यापूर्वीची दोन पदके २०११ मध्ये जिंकली होती, ज्यात एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळाले होते. या स्पर्धेच्या ३५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच तीन भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचल्या. यापैकी ५० किलो आणि ७६ किलो गटातील दोघींनी ऑलिम्पिक वजन गटांमध्ये विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला.
मनीषाने कॅनडाच्या लॉरेन्स ब्युरिगार्डला पराभूत करून या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या बोलोर्तुया खुरेलखूला ६-० ने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. हरियाणाच्या या कुस्तीपटूने अंतिम चारमध्ये कझाकस्तानच्या एल्टिन शागायेवाला पराभूत करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. मनीषाच्या आधी सुशील कुमारने विश्वचॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याने २०१० मध्ये मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या ६६ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे