पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १० जणांचा मृत्यू
इस्लामाबाद, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गुरुवारी रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन किमान १० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. थारपारकर जिल्ह्यातील नगरपारकर परिसरात ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या ए
पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १० जणांचा मृत्यू


इस्लामाबाद, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गुरुवारी रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन किमान १० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. थारपारकर जिल्ह्यातील नगरपारकर परिसरात ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या वेळी थारपारकर जिल्ह्यातील नगरपारकर भागातील डानो धांधाल गावातील एका आरोग्य केंद्रात घडली, जिथे रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत वैद्यकीय केंद्रातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रुग्णवाहिका वैद्यकीय सुविधेजवळ उभी असताना ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि वाहनाला आग लागली. बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, लागलेल्या आगीत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली, तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

थारपारकरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) आरिफ अझीझ जाफरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. रुग्णवाहिकेत चालक ऑक्सिजन सिलिंडरची जागा बदलत असताना त्याचा अचानक स्फोट झाला, असे त्यांनी सांगितले.या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याचेही जाफरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी मृतांबद्दल दुःख व्यक्त केले असून, स्फोटाचे कारण शोधण्यासाठी त्वरित आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे, असे त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक कराव्यात, असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले. झरदारी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande