
रायगड, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। वय अवघे १७ वर्षे... पण ताकदीचा आवाका थक्क करणारा! श्रीवर्धन तालुक्यातील दिघीचा सुपुत्र आणि सध्या मुंबईतील चांदिवली-अंधेरी येथे वास्तव्यास असलेल्या वेदांत दिनेश नागवेकर याने राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तब्बल ४६५ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या दमदार कामगिरीची दखल घेत त्याला मानाचा ‘स्ट्रॉंगमन ऑफ महाराष्ट्र’ किताब देऊन गौरविण्यात आले.
नेरूळ येथील जुहू नगरमधील गणेश मंदिर हॉलमध्ये २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (नागपूर) आणि नवी मुंबई पॉवरलिफ्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप पार पडली. आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी ही अधिकृत निवड चाचणी होती.
६६ किलो सब-ज्युनिअर गटात नवी मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेदांतने स्क्वॅटमध्ये १७५ किलो, बेंचप्रेसमध्ये ८० किलो आणि डेडलिफ्टमध्ये तब्बल २१० किलो वजन उचलले. या तिन्ही प्रकारांत मिळून त्याने ४६५ किलोचा विक्रमी भार पेलत प्रथम क्रमांक पटकावला. सिंगल इव्हेंट डेडलिफ्टमध्येही २१० किलो वजन उचलून त्याने सुवर्ण कामगिरी केली.
यापूर्वी जुलैमध्ये पवई येथे झालेल्या डब्ल्यूआरपीएफ ओपन वेस्ट झोन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने ४५० किलो वजन उचलत आपली ताकद सिद्ध केली होती. अवघ्या १७व्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे दिघीपासून रायगडपर्यंत वेदांतच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. कठोर सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आपली दावेदारी मजबूत केली असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)