
रायगड, 04 ऑक्टोबर, (हिं.स.)। कर्जत येथे ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत खोपोलीच्या कै. भाऊसाहेब कुंभार कोचिंग सेंटरने दमदार कामगिरी नोंदवली. स्पर्धेत सेंटरच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण आणि ४ कांस्य अशी एकूण १० पदके मिळवली. सुवर्णपदक विजेत्या सहा मल्लांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुवर्णपदक पटकावणाऱ्यांमध्ये आस्था सुनील नाडवीरमणी (३० किलो), लावण्या परशुराम शिंगे (४६ किलो), दर्पण परशुराम शिंगे (४१ किलो), श्रेयस चंद्रकांत शिंदे (५२ किलो), वृषभ राजेंद्र महाडीक (४५ किलो) आणि स्वराज शिवाजी श्रीखंडे (६१ किलो) यांचा समावेश आहे. तर तनिष एकनाथ पाटील (४४ किलो), राज प्रवीण मिणीगे (४४ किलो), आदर्श जितेश केदारी (५५ किलो) आणि करण भूषण पाटील (५७ किलो) यांनी कांस्यपदक मिळवले.
या कामगिरीनंतर खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपभाई शेंडे यांनी विजेत्यांचा सत्कार करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक सुनील खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी ही कामगिरी केली. त्यांच्या प्रशिक्षणासोबतच माजी नगरसेवक घासे आणि ओमकार पवार यांचेही सहकार्य लाभले.
जिल्हास्तरावर मिळवलेल्या या यशामुळे खोपोलीच्या कुस्ती क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही मल्लांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)