
पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा पारंपारिक श्राद्ध विधी तो करणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या पूर्वजांमध्ये मोजता येण्याजोगे ऊर्जेतील बदल घडवून आणू शकतो का? महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा यांनी केलेल्या एका अभ्यासातून अत्यंत असाधारण निष्कर्ष समोर आले आहेत.
या अभ्यासात, चार श्राद्धकर्त्यानी (त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह) त्यांच्या पितरांसाठी श्राद्ध विधी केला आणि दोन पुरोहितांनी विधी संपन्न केला. संशोधक पथकाने 'ऑरा अँड एनर्जी स्कॅनर' (Aura and Energy Scanner) चा वापर करून विधीपूर्वी आणि विधीनंतर श्राद्धकर्त्या व्यक्ती, पुरोहित आणि विधीतील घटकांच्या सूक्ष्म ऊर्जेच्या प्रभावळीच्या (Aura) नोंदी घेतल्या.
विशेष म्हणजे, चारही श्राद्धकर्त्यामधील नकारात्मक ऊर्जेत सुमारे ५०% घट झाली आणि सकारात्मक ऊर्जेत सुमारे दुप्पट वाढ झाली. चौथ्या श्राद्धकर्त्याच्या पत्नीच्या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत तब्बल ६०% घट झाली, तर तिची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १००% हून अधिक वाढली. विधीमध्ये सहभागी झालेल्या पुरोहितांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत विधीनंतर सरासरी ५५% हून अधिक वाढ झाली. भगवान दत्तात्रेयांच्या (रक्षण करणारी आणि पितरांना गती देणारी देवता) प्रतिमेच्या सकारात्मक ऊर्जेत विधीनंतर ४७% ची उल्लेखनीय वाढ दिसून आली.
संशोधकांनी विधीच्या घटकांमध्येही, उदा. पिंड, दर्भ आणि नैवेद्य यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल नोंदवले. पितरांना अर्पण केलेले अन्न (पिंड - तीळ मिसळलेला भात) आणि दर्भ यांच्या नकारात्मक ऊर्जेत विधीनंतर अनुक्रमे २५ मीटर आणि १९ मीटरहून अधिक वाढ दिसून आली. देवांना दाखवलेल्या नैवेद्याच्या सकारात्मक ऊर्जेत श्राद्धानंतर १४४% एवढी थक्क करणारी वाढ झाली. एका पूर्वजांच्या छायाचित्रातील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ५४% घट झाल्याचे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे आढळले.
अशा उल्लेखनीय नोंदी या विधीच्या प्राचीन तरीही वैज्ञानिक आधाराची साक्ष देतात. श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही आध्यात्मिक लाभ मिळतो. हा विधी जर भावपूर्ण (भाव ठेवून) केला तर मिळणारी सकारात्मक ऊर्जा अधिक असते. भगवान दत्तात्रेय ही पितरांना गती देणारी देवता आहेत. श्राद्धाच्या ठिकाणी त्यांचे चित्र ठेवून त्यांची भावपूर्वक पूजा केल्याने त्यांचे तत्त्व कार्यरत होते;ज्याचा फायदा कुटुंबातील सर्व सदस्यांना होतो आणि पूर्वजांना त्यांच्या परलोकातील प्रवासात गती मिळते. मंत्रोच्चारासह पितरांना अर्पण केलेला पिंड त्यांना आकर्षित करतो व तृप्त करतो, ज्यामुळे त्यांना गती मिळण्यास मदत होते आणि त्यांच्यामुळे वंशजांना होणारा त्रास कमी होतो.
संशोधकांचा असा निष्कर्ष आहे की, श्राद्ध विधीमुळे विधी करणारे वंशज, त्यांचे कुटुंब, पुरोहित आणि पूर्वज या सर्वांना आध्यात्मिक लाभ मिळतो, जे हिंदू परंपरेतील या विधीचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते. श्राद्धासोबतच, आध्यात्मिक लाभ वाढवण्यासाठी पितृ पंधरवड्यादरम्यान दररोज एक ते दोन तास “ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ” हा नामजप करावा.
— मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी