
मुंबई, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना परिसरात फ्री फायर या ऑनलाइन गेमच्या आयडीवरून झालेल्या वादाचे रूपांतर चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातून दिलशाद शाह या तरुणाच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एका अन्य संशयिताचा सहभाग आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कलिना येथील कुंची कुरवे नगर परिसरातील सेंट रॉक चर्चच्या पायऱ्यांजवळ ही घटना घडली. ऑनलाइन फ्री फायर गेमच्या आयडीवरून काही तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर प्रथम हाणामारीत आणि त्यानंतर चाकूहल्ल्यात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात दिलशाद शाह याच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार करण्यात आल्याचा आरोप असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी सलमान फारुक शाह यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरबेज शाह, मुसाहिद वकील अहमद खान, कौसर अली जमील शाह आणि अनस सय्यद यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्यापैकी मुसाहिद वकील अहमद खान, अरबेज शाह आणि कौसर अली जमील शाह या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(१), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. हल्ल्यातील आरोपींची नेमकी भूमिका, वादाचे मूळ कारण आणि या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या ऑनलाइन गेमच्या आयडीवरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने या घटनेची चर्चा होत आहे. गेममधील वादातून प्रत्यक्ष आयुष्यात हिंसक प्रकार घडल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जखमी दिलशाद शाह याच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्याचे तक्रारीत नमूद असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule