
परभणी, 05 ऑक्टोबर (हिं.स.)। मैदानी क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणी अंतर्गत रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवित आपले कौशल्य सिद्ध केले असून एकूण 19 खेळाडूंची जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.
14 वर्षांखालील मुलांच्या 100 मीटर धावण्याच्या प्रकारात महेश राजेश नरवडे याने प्रथम क्रमांक मिळविला. 19 वर्षांखालील मुलांच्या 100 मीटर धावण्यात अभय प्रशांत शिंदे याने प्रथम, तर 200 मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला. दीपक तुकाराम कुरुडे याने 19 वर्षांखालील मुलांच्या 400 मीटर व 800 मीटर धावण्याच्या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला. लांब उडीमध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या गटात यशराज कल्याण सिराळ, 17 वर्षांखालील मुलांच्या गटात शिवराज अशोकराव लावंडे आणि 19 वर्षांखालील मुलांच्या गटात स्वराज उद्धव भिसे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटातही विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. 17 वर्षांखालील मुलींच्या 100 मीटर धावण्यात रोहिणी रमेशराव हरकळ, 200 मीटर धावण्यात श्रिषा सुनीलराव देशमुख आणि 1500 मीटर धावण्यात पुनम भगवानराव तिठे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. 19 वर्षांखालील मुलींच्या 1500 मीटर धावण्यात सायली राजेंद्र भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावला. 3000 मीटर धावण्याच्या प्रकारात 17 वर्षांखालील मुलींच्या गटात पुनम भगवानराव तिठे हिने प्रथम, तर रिया रविंद्र चव्हाण हिने द्वितीय क्रमांक मिळविला. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सायली राजेंद्र भोसले हिने प्रथम, तर सारिका भोजणे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. 14 वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक प्रकारात श्रेया हनुमान गायकवाड हिने द्वितीय क्रमांक मिळविला. क्रॉस-कंट्रीमध्येही विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. 4 किलोमीटर क्रॉस-कंट्रीमध्ये पुनम भगवानराव तिठे हिने द्वितीय, तर सायली राजेंद्र भोसले हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व खेळाडूंनी जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळविल्याने विद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, सचिव प्रा. सोनटक्के तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis