बीसीसीआयच्या कर्नल सीके नायडू स्पर्धेसाठी २३ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या चौघांची निवड
नाशिक, 05 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या साहिल पारख, शर्विन किसवे ,रविंद्र मत्च्या व ऋषिकेश कातकाडे या चार खेळाडूंची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय -२०२६-२७ च्या कर्नल सी के नायडू स्पर्धेसाठी २३ वर्षांखालील महाराष्ट्र क
बीसीसीआयच्या कर्नल सीके नायडू स्पर्धेसाठी २३ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या चौघांची निवड


नाशिक, 05 ऑक्टोबर (हिं.स.)।

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या साहिल पारख, शर्विन किसवे ,रविंद्र मत्च्या व ऋषिकेश कातकाडे या चार खेळाडूंची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय -२०२६-२७ च्या कर्नल सी के नायडू स्पर्धेसाठी २३ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.

नाशिकच्या या चौघाही क्रिकेटपटूंनी यापूर्वी विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघातर्फे देखील विविध वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए इन्विटेशन लीग ) वेळोवेळी अतिशय सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरी केली आहे. या हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने खेळविलेल्या चाचणी सामन्यात देखील प्रभावी कामगिरी करून या चौघांनी महाराष्ट्र निवड समितीवर चांगली छाप पाडली. या सर्व कामगिरीच्या जोरावरच त्यांना २३ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात संधी मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू व आय पी एल साठी दिल्ली कॅपिटल संघातर्फे खेळलेला आक्रमक डावखुरा सलामीवीर महाराष्ट्र संघाच्या साहिल पारखचा सर्व नाशिककरांना अभिमान आहेच. नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना ,आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता. यष्टीरक्षक शर्विन किसवे हा देखील डावखुरा सलामीवीर आहे. साहिल व शर्विन या दोघांनी महाराष्ट्र संघातर्फे १९ वर्षांखालील बीसीसीआय च्या कुच बिहार करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच बीसीसीआय तर्फे आयोजित माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या , नॅशनल क्रिकेट अकादमी - एन सी ए - च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी

दोघांचीही निवड झाली होती. १४ वर्षे वयोगटापासूनच साहिल व शर्विनने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रविंद्र मत्च्या मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज असून, उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करतो. नाशिक जिल्हा क्रिकेट संघातर्फे आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए इन्विटेशन लीग) संघाला पुढे नेण्यात त्याने वेळोवेळी महत्वाचे योगदान दिले आहे. मूळचा सिन्नरचा, नाशिकच्या ग्रामीण भागातून अतिशय मेहनतीने पुढे आलेला जलदगती गोलंदाज ऋषिकेश कातकाडे याने देखील विविध वयोगटात नाशिक जिल्हा क्रिकेट संघातर्फे महत्वाचे योगदान दिले असून गेली काही वर्षे तो पुणे येथे क्रिकेट खेळत आहे. नाशिकचा पाचवा खेळाडू रोहन शेडगे या स्पर्धेत रेल्वे तर्फे खेळणार आहेच .

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ( एम सी ए ) ने बीसीसीआय कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी २०२६-२७ मधील ‘एलिट बी’ गटातील उत्तर प्रदेश आणि आसामविरुद्धच्या सामन्यांसाठी पुणे येथे महाराष्ट्राचा २३ वर्षांखालील पुरुष संघ जाहीर केला आहे. किरण चोरमळे या संघाचा कर्णधार असेल. उत्तर प्रदेशविरुद्धचा सामना १२ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान मेरठ येथे, तर आसामविरुद्धचा सामना १९ ते २२ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आसाम क्रिकेट असोसिएशन अकॅडमी ग्राउंड ,फुलुंग येथे होणार आहे. नाशिकच्या या उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्वपूर्ण निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट क्षेत्रात सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व पदाधिकाऱ्यांनी साहिल पारख, शर्विन किसवे ,रविंद्र मत्च्या व ऋषिकेश कातकाडे यांचे व त्याच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करून आगामी कर्नल सी के नायडू स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande